रवंदेत घरांवर मुलींच्या नावाच्या पाट्या
By admin | Updated: April 11, 2017 17:37 IST
शिवशंकर विद्यालयाने पुढाकार घेऊन शाळेतील सर्व ५३० मुलींच्या नावाच्या पाट्या त्यांच्या घराच्या दरवाजावर बसवून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’अभियान प्रत्यक्षात राबविले आहे.
रवंदेत घरांवर मुलींच्या नावाच्या पाट्या
चांदेकसारे : रयत शिक्षण संस्थेच्या रवंदे (ता. कोपरगाव) येथील शिवशंकर विद्यालयाने पुढाकार घेऊन शाळेतील सर्व ५३० मुलींच्या नावाच्या पाट्या त्यांच्या घराच्या दरवाजावर बसवून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’अभियान प्रत्यक्षात राबविले आहे.पेढे वाटून आनंद करणारा समाज मुलीच्या जन्माने दु:खी झालेला पाहायला मिळतो. अनेक कळ्या जन्माला येण्या आधीच खुडल्या जातात. परिणामी स्त्री-पुरूष गुणोत्तर प्रमाण ढासळले आहे. हे थांबविण्यासाठी शासनाने लेक वाचवा, लेक शिकवा हे अभियान सुरू केल्याचे प्रतिपादन रवंदेच्या शिवशंकर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक बी.के. सांगळे यांनी केले.शाळेतील सर्व ५३० मुलींच्या नावाच्या पाट्या तयार करून त्यावर ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ हा संदेश, मुली व विद्यालयाच्या नावाचा मजकूर छापण्यात आला. गावातून प्रभात फेरी काढून मुलगी शिकली प्रगती झाली, स्त्री भ्रूण हत्या थांबवा देश वाचवा, अशा घोषणा देत जनजागृती करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थिनीच्या घरी मुख्य दरवाजावर तिच्या नावाची पाटी लावून सन्मान करण्यात आला. आपल्या मुलींचा शिक्षकांनी केलेला आगळा-वेगळा सन्मान पाहून पालक भारावून गेले. याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, सोनाली थोरात, ज्ञानेश्वर पायमोडे आदी उपस्थित होते.