मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूरश्रीरामपूर शहराच्या दुसऱ्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यात भविष्यातील जिल्हा मुख्यालय डोळ्यासमोर ठेवून रचना व जागांचे आरक्षण करण्यात आले आहे. एकप्रकारे हा आराखडा जिल्ह्यासाठीची पायाभरणीच आहे. आराखड्यात एकूण ९७०.१० हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे.नगररचना विभागाने तयार केलेला श्रीरामपूर शहराचा विकास आराखडा सध्या जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. त्यावर १४ मार्चपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. शहराची ३ भागांत विभागणी करून विकासाचा आराखडा तयार केला आहे. २०२८ मधील म्हणजे आगामी १० वर्षांची प्रस्तावित लोकसंख्या व शहराचा होणारा विकास लक्षात घेऊन या आराखड्यात आरक्षण व इतर तरतुदी करण्यात आल्या आहेत. अ.भू.क्र. ४५२ ते ४५५ अ मध्ये सरकारी कार्यालये व निवासस्थानांसाठी ७.७७ हेक्टर जमीन आरक्षित ठेवण्यात आली आहे. या आरक्षणांमुळे भविष्यात श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय झाल्यास नवी सरकारी कार्यालये व तेथील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी इमारती बांधण्यास ऐनवेळी जागेची शोधाशोध घ्यावी लागणार नाही. भविष्याचा वेध घेऊन आराखड्यात ही व्यवस्था आधीच केली आहे. आराखड्यानुसार श्रीरामपूर शहरात ४२ शाळा, ८१ दवाखाने आहेत. शहरात ३३०.९० हेक्टर क्षेत्र निवासी क्षेत्रात असून त्यातील ६१.४० टक्के भाग विकास आराखड्यानुसार विकसित झाला आहे. ४३.११ हेक्टर व्यावसायिक जमीन असून यातील ८.०२ टक्के क्षेत्र डी.पी.नुसार विकसित आहे. १०.१७ हेक्टर क्षेत्र औद्योगिक असून जेमतेम १.८९ टक्के क्षेत्र विकसित झाले आहे. ५२.८७ हेक्टर क्षेत्र सार्वजनिक व निमसार्वजनिक वापराचे असून ९.८१ टक्के विकसित झाले आहे. उद्याने, खेळाची मैदाने, खुल्या जागांसाठी ३.२४ हेक्टर क्षेत्र असून ०.६० टक्के क्षेत्र विकसित आहे. रस्ते, रेल्वे व दळणवळणासाठी ८५.०१ हेक्टर क्षेत्र असून यातील १५.७७ टक्के क्षेत्र विकसित झाले आहे. एकूण ५३८.९३ हेक्टर क्षेत्र पूर्णपणे विकास आराखड्यात असून ५५.५५ टक्के क्षेत्र आराखड्यानुसार विकासाच्या वाटेवर आहे. याशिवाय शेती, स्मशानभूमी, वॉटर बॉडिजचे ४३१.१७ हेक्टर क्षेत्र अविकसित आहे. सुधारित विकास आराखड्यात एकूण ९७०.१० हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे.
श्रीरामपूरची नव्या जिल्ह्यासाठी पायाभरणी
By admin | Updated: March 10, 2016 23:14 IST