पारनेर : संत तुकाराम साखर कारखाना माजी खासदार नानासाहेब नवले यांनी अत्यंत कष्टाने उभारून आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी पारनेर साखर कारखाना सुरू केल्याने त्यांच्याकडून शेतकरी व कामगार हिताचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.पारनेर तालुका साखर कारखाना संत तुकाराम कारखान्याचे प्रमुख, माजी खासदार नानासाहेब नवले यांच्या ‘क्रांती शुगर’ ने विकत घेतला आहे. यंदाच्या दुसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ अण्णा हजारे यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. माजी खासदार अशोकराव मोहोळ अध्यक्षस्थानी होते.अण्णा हजारे म्हणाले, माजी खासदार नानासाहेब नवले यांच्याकडे संत तुकाराम महाराज यांच्या विचारांची नितीमत्ता असल्याने त्यांनी साखर कारखानदारीच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील शेतकरी व कामगार यांना न्याय देण्याचा प्रयत्न चालवला आहे. अध्यक्ष ज्ञानेश नवले यांनीही पारनेर कारखान्यासाठी विविध उपाययोजना चालवल्या आहेत. माजी खासदार नानासाहेब नवले म्हणाले, आम्हाला अण्णा हजारे यांच्या सारख्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या उसाला चांगलाच भाव देऊ. पारनेरकरांनीही कारखान्याला ऊस द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.निघोज परिवाराचे मार्गदर्शक बाबासाहेब कवाद व जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी पारनेर कारखाना सुरू झाल्याने परिसरातील अर्थकारण बदलणार असल्याचे सांगितले. कार्यकारी संचालक साहेबराव पठारे यांनी कारखान्याच्यावतीने पुढील उपाय योजनांविषयी माहिती दिली.यावेळी अध्यक्ष ज्ञानेश नवले, बाळासाहेब नवले, सुमीत नवले, ज्ञानेश्वर लांडगे, शांताराम लंके, अॅड.पांडुरंग गायकवाड, रमेशचंद्र ढमाले, निलेश नवले, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र सुर्वे, सरव्यवस्थापक जगन्नाथ जायकर आदी उपस्थित होते.
‘पारनेर’कडून शेतकरी,कामगारहिताचे निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 00:58 IST