जामखेड : तालुक्यातील अरणगाव येथील शेतकरी वसंत सोपान राऊत (वय ५५) या शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कवडगाव शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्याच्या मागे पत्नी, दोन मुले,सुना, दोन विवाहित मुली असा मोठा परिवार आहे. या घटनेने अरणगाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे़ जामखेड पोलीस ठाण्यात मयताचे नातेवाईक अंबादास शिवदास राऊत यांनी खबर दिली़ पोलीस निरीक्षक रामचंद्र देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह जामखेड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. दुपारी दीडच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अरणगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या घटना वाढत आहेत. दुष्काळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)
नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: March 10, 2016 23:13 IST