अहमदनगर : जिल्ह्यामध्ये मे २०२१ या एकाच महिन्यामध्ये ० ते १८ वयोगटातील ८ हजार ८८१ मुलांना कोरोनाची लागण झाली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी ‘लोकमत’ ला दिली. यातील शंभर टक्के मुले बरे होऊन घरीही गेली आहेत.
एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. एकट्या एप्रिल महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये ८०,११८ इतके कोरोनाबाधित आढळून आले, तर मे २०२१ या एका महिन्यामध्ये ८७, ०९५ एवढे कोरोबाधित आढळून आले. एप्रिल व मे-२०२१ महिन्यामध्ये बाधित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते. एप्रिल-मे मध्ये एकूण चाचण्यापैकी बाधित होण्याचे प्रमाण (पॉझिटिव्ह रेट) हे ४२ ते ५१ टक्क्यांपर्यंत गेले होते. जिल्ह्यात ऑक्सिजन बेड, रेमडेसिविरची टंचाई होती. जिल्ह्यात रुग्णांना बेडही मिळत नव्हते. जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील सर्व व्यक्ती बाधित होण्याचे प्रमाण वाढलेले होते. अशा कुटुंबामध्ये साहजिकच लहान मुलांचाही समावेश होता. तसेच ते त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होते. त्यामुळे चाचणी केल्यानंतर त्यांच्याही चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. परंतु त्या मुलांना कुठलीही कोरोनाची लक्षणे नसल्याने त्यांना घरामध्येच विलगीकरणात ठेवले होते. काही मुले कोविड सेंटरमध्ये दाखल होती. लहान मुलांमध्ये गंभीर अशी कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
------
पहिल्या लाटेतही लहान मुले बाधित झाली होती. दुसऱ्या लाटेमध्येही लहान मुले बाधित झाली आहेत. एकूण बाधित रुग्णांपैकी लहान मुले बाधित होण्याचे एप्रिल व मे महिन्यातील प्रमाण हे अनुक्रमे ९ ते ११ टक्के इतके आहे. एकाच कुटुंबांमध्ये अनेक जण पॉझिटिव्ह येत असल्यामुळे साहजिकच त्या कुटुंबामध्ये लहान मुलांचाही समावेश असतो. त्यामुळे मुलांच्याबाबत कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही. तशी कोणतीही चिंता करण्यासारखी स्थिती नाही.
- डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्यचिकित्सक
-----
जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यात कोरोबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. बाधित रुग्णांच्या संपर्कातील सर्वांच्याच चाचण्या करण्यात येत होत्या. त्यात कुटुंबातील लहान मुलांचाही समावेश होता. एकाच मे महिन्यात ८ हजार ८८१ मुले बाधित झाली. लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, अशाही सूचना जिल्हा रुग्णालयाला दिल्या आहेत.
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी
-----
असे आहेत एकूण पॉझिटिव्ह
एप्रिल -२०२१- ८०११८
मे-२०२१- ८७०९५
----
अशी आहेत लहान मुले बाधित (मे-२०२१)
वयोगट बाधित
० ते १ - ८५
१ ते १२- २६९४
१३ ते १८ - ६१०२
एकूण - ८८८१