शेवगाव : रोटरी क्लब व नगर कट्टा अभियंता ग्रुपतर्फे फलकेवाडी व अमरापूर (ता. शेवगाव) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मोफत औषधे व कोविड किटचे वाटप गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, माजी प्राचार्य दिलीप फलके, ढोरजळगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील बडे, डॉ. वर्षा साळवे, सरपंच बाळासाहेब मरकड, रोटरीचे सचिव बाळासाहेब चौधरी, उपसरपंच दिनकर डोईफोडे, ग्रामसेवक अविनाश म्हस्के, तलाठी अमोल कचरे, सुनीता फलके, मनीषा मरकड, बाबासाहेब फलके, गणेश वाघ, माया गाढेकर, संजय तरटे आदी प्रमुख उपस्थित होते. डोके म्हणाले, कोरोना असाध्य आजार नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना वाळीत टाकू नका. एकमेकांना मदत केली तरच आपण कोरोनावर मात करू शकतो. आपल्याला सगळ्या घटकांना घेऊन तालुका कोरोनामुक्त करायचा आहे.
नगर कट्टा अभियंता ग्रुपचे शिवाजी बोलभट, एम. पी. खाडे, दिलीप फलके यांच्या योगदानातून २५ हजार रुपये किमतीची अत्यावश्यक औषधे, सॅनिटायझर, रोगप्रतिकारक गोळ्या, मास्क आदी आरोग्य साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण फलके यांनी केले. बाळकृष्ण कंठाळी यांनी आभार मानले.