प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना याबाबत निवेदन दिले. डाॅ. बोरगे अनेक दिवसांपासून नगर मनपात कार्यरत असून महापालिकेतील त्यांचा कारभार सतत वादग्रस्त ठरला आहे. नगर शहरात मृत्युमुखी पडलेल्या शवांचे वेळेवर अंत्यसंस्कार न करणे, स्वत: दालनात रेमडेसिविर इंजेक्शन अवैधरित्या बाळगणे, स्वत:च्या वाढदिवसानिमित्त कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता एका दालनात अनेक पुरूष व महिला कर्मचाऱ्यांना एकत्र करून गाण्यांवर थिरकणे, स्वत:च्या कार्यालयात गाणे शूट करून ते पसरविणे, उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा कामगार महिलांचे वेळेवर पगार न करणे, मातृत्व वंदना योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ न देणे, कोरोना पीडितांनी त्यांना कामानिमित्त फोन केल्यास कोणतेही उत्तर न देेणे, बोल्हेगाव येथील मनपा महिला कर्मचाऱ्याच्या घरात जाऊन पार्टी करत असताना १४ वर्षीय मुलाला मद्यप्राशन करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, असे अनेक प्रकार या अधिकाऱ्याने केले आहेत. जर हा अधिकारी निर्दोष असेल तर आयुक्तांनी तसे लेखी प्रहार संघटनेला द्यावे. नसेल तर महापालिका प्रशासनाने तातडीने या अधिकाऱ्याविरोधात कारवाई करून त्यांना बडतर्फ करावे, अन्यथा प्रहार संघटनेचे हभप अजय महाराज बारस्कर, राज्य प्रवक्ते संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या दालनासमोर या अधिकाऱ्याच्या पुतळ्याचे अंत्यसंस्कार करण्यात येतील, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, सचिव प्रकाश बेरड, उपाध्यक्ष देवीदास येवले, सल्लागार मालोजी शिकारे आदींनी दिला आहे.
---