राहुरी : तालुक्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. तपास लावण्यात पोलिसांना सातत्याने अपयश येत आहे. त्या निषेधार्थ राहुरीत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जम्बो मोर्चा काढला. राहुरीचा बिहार झाल्याची टीका करत तनपुरे यांनी राग व्यक्त केला. दरम्यान, थोडा कालावधी द्या, आम्ही गुन्हेगारी आटोक्यात आणू, असे आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिले.गेल्या काही दिवसांपासून राहुरीत गुन्हेगारी मोठी डोकेदुखी बनली आहे. चोऱ्या व गुंडगिरी वाढल्याने लोकांत असंतोषाचे वातावरण होते़ त्या पार्श्वभूमीवरबुधवारी सकाळी ११ वाजता राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती ते राहुरी पोलीस स्टेशन असा जम्बो मोर्चा काढण्यात आला़ पोली स्टेशनमध्ये गेल्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले़जाहीर सभेत तनपुरे यांनी सुरक्षेचा विषय ऐरणीवर आणला. येथे गुन्हेगार पकडण्यासाठी पोलीस नाहीत आणि शिंगणापूर फाट्यावर वसुलीसाठी पोलीस ठेवले जातात़ सम-विषम पार्किंग, तसेच सिग्नलसाठी खर्च करण्यात आला़ मात्र तेथे पोलीस नसल्याने सिग्नल बंद आहेत़ शांतताप्रिय असलेला तालुका आता बिहारपेक्षाही भयानक झाला आहे़ विद्युत मोटारींची चोरी, अवैध धंदे, महिलांची असुरक्षितता वाढली आहे़ सामान्यांना वाऱ्यावर सोडून पोलीस दुसरीकडेच संरक्षण देतात, अशी टीका प्रसाद तनपुरे यांनी केली़अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपविभागीय अधिकारी राकेश ओला व पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले़ गुन्हेगारी थांबली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला़ मोर्चापुढे प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे, दत्तात्रय अडसुरे, पंढरीनाथ पवार, किशोर जाधव, अॅड. भाऊसाहेब पवार, प्रकाश देठे, निर्मला मालपाणी, योगेश तनपुरे, पंकज लोढा, सीताराम लांबे, संजय कुलकर्णी, सय्यद निसार, सरपंच गागरे यांची भाषणे झाली़ मोर्चामध्ये सभापती अरूण तनपुरे, नगराध्यक्षा उषा तनपुरे, उनगराध्यक्ष अशोक आहेर आदी सहभागी झाले होते़(तालुका प्रतिनिधी)
राहुरीचा बिहार झालाय काय?
By admin | Updated: March 10, 2016 00:03 IST