नेवासा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व गुरूकुल मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक बँकेच्या नेवासा शाखेसमोर शनिवारी शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी निदर्शने केली. गुरूकुल मंडळाचे जिल्हाध्यक्ष नितीन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती अध्यक्ष भास्कर नरसाळे व गुरूकुल मंडळाचे अध्यक्ष संदीप जंगले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सध्या शिक्षक बँकेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्यासाठी आपण सर्व सभासदांनी एकजुटीने प्रयत्न करावे, असे आवाहन नितीन काकडे यांनी केले.बंद केलेले सर्व कर्ज प्रकरण तात्काळ सुरू करावे, सर्व कर्जाचा व्याजदर ९ टक्के करावा, प्रासंगिक कर्ज सुरू करावे, सोने तारण कर्ज व्याजदर किमान ठेवावा, संचालकांवरील अवास्तव खर्च कमी करावा आदी मागण्यांसाठी समितीतर्फे निवेदन काढण्यात आले. ते बँक व्यवस्थापक थलजाळे यांनी स्वीकारले. सत्ताधाऱ्यांनी प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या बँकेचे सर्व कर्ज बंद करून सभासदांची आर्थिक कोंडी केल्याचा आरोप समिती अध्यक्ष भास्कर नरसाळे यांनी केला. कर्जाचा व्याजदर ९ टक्के करावा, अशी मागणी मंडळाचे अध्यक्ष संदीप जंगले यांनी केली. यावेळी संचालकांच्या खुर्चीला आंदोलकांनी नोटांचा हार घातला व सर्व संचालकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे बनावट नोटांचे पार्सल पोस्टाने त्यांच्या घरी पाठविणार असल्याचे काकडे यांनी सांगितले. आंदोलनात काकडे, भास्कर नरसाळे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
विविध मागण्यांसाठी शिक्षक बँकेसमोर निदर्शने
By admin | Updated: June 28, 2014 23:39 IST