अहमदनगर : दरवर्षी १८ डिसेंबरला जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात येतो. मात्र, यंदा ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सदरचा दिन साजरा करण्यात येणार नसल्याने समितीच्या सदस्यांना कळविण्यात आले. आचारसंहिता सुरू असताना जिल्हा पुरवठा विभागाने २४ डिसेंबरला शासकीय स्तरावर ग्राहक दिन साजरा करण्यात आला. मात्र, अल्पसंख्याक समाजाबाबत प्रशासनाने असा दुजाभाव का केला, असा सवाल जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख यांनी केला आहे. याबाबत शेख यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन दिले. अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा न केल्याने आता मुस्लीम अल्पसंख्याक समाजाच्या जिल्हास्तरीय प्रश्न सोडविण्यासाठी लवकरात लवकर बैठक घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हक्क दिवस रद्द केल्याने शासकीय स्तरावर अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांना कडेलोट करण्यात आले काय, अशी शंकाही शेख यांनी निवेदनात उपस्थित केली आहे.
---
फोटो- २ उबेद शेख
जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उबेद शेख यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन दिले.