लोकमत न्यूज नेटवर्क
दहिगाव बोलका : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोनामुळे बाधित झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील १७ गावांतील ३२ हजार ग्रामस्थांची आरोग्यसेवा केली जाते. मागील वर्षी कोविडची साथ सुरू झाल्यापासून कोविड रुग्णांची दखल घेतली जात आहे. त्यानुसार, माहे मे २०२१ महिन्याच्या अखेरीस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे १,०३४ रुग्णांची कोविड चाचणी सकारात्मक आलेली आहे, तर २१ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. कोविडवर परिसरातील ९८ टक्के रुग्णांनी मात केली आहे. सतरा गावांपैकी ८ गावांत एकही रुग्ण दगावला नाही, तर उर्वरित ११ गावांपैकी सर्वात जास्त १० रुग्ण करंजी येथील, आंचलगाव येथील ३, बोलकी व पढेगाव येथील प्रत्येकी २ तर कासली, तिळवणी, उक्कडगाव व खिर्डी गणेश येथील प्रत्येकी १ रुग्ण दगावला आहे. कोविडच्या सकारात्मक चाचण्या करंजी येथील २८६ आलेल्या आहेत, तर त्या खालोखाल दहिगाव बोलका येथे १६२ आलेल्या आहेत. उक्कडगाव येथे १०३ रुग्णांची कोविड चाचणी सकारात्मक आलेली आहे, तर उर्वरित १४ गावांत १ ते १०० पर्यंत चाचणी अहवाल सकारात्मक आलेले आहेत. सर्वात कमी रुग्णसंख्या ही ओगदी येथे अवघी ६ तर सावळगाव येथे ८ आढळली आहे.
------
होम आयसोलेशनऐवजी शासकीय कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पाठविल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर योग्य उपचार झाल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
-डॉ.प्रज्ञा भगत, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, दहिगाव बोलका.
---------
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातच रॅपिड अँटिजन टेस्ट सुरू केल्या, त्यामुळे कोविड रुग्ण लवकरात लवकर आढळले, योग्य उपचारांनी ते बरेही झाले व त्यांच्यामुळे बाधित होण्याचे प्रमाणही कमी झाले.
- डॉ.वैशाली बडदे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, दहिगाव बोलका.