अकोले : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे अगस्ती आश्रमातील भक्त निवासामध्ये १५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. त्याचा शुभारंभ शुक्रवारी आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष ॲड. के. डी. धुमाळ, तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.
या नव्या कोविड सेंटरमुळे अकोलेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. शहरालगत खानापूर येथे १०० बेडचे सरकारी कोविड केअर केंद्र सुरू आहे. तेथे ऑक्सिजन बेडची संख्या ३० करण्यात आली आहे. समशेरपूर, राजूर, कोतूळ या तीन ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी ३० बेडचे सरकारी कोविड सेंटर सुरू आहे. राजूरला नवीन कोरोना सेंटर सुरू झाले. तेथे आमदार लहामटे यांनी पाहणी केली असता पहिल्याच दिवशी रुग्णांची गैरसोय झाल्याचे आढळून आले. रुग्णांची हेळसांड होता कामा नये, अशा सक्त सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. लवकरच आढळा विभागात केळी - रूम्हणवाडी येथील वसतिगृहाच्या इमारतीत शासकीय कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे लहामटे यांनी सांगितले.
अगस्ती साखर कारखाना, दानशूर संस्था व व्यक्ती यांच्या योगदानातून कोविड सेंटर सुरू झाले आहे. रुग्णांसाठी जेवण व नाष्ट्याची सोय प्रशासन करणार आहे. इतर सुविधा अगस्ती कारखाना, समाजसेवी करणार असल्याचे समजते. अगस्ती धार्मिक स्थळ असल्याने कोविड उपचार घेणाऱ्यांच्या नातेवाईकांनी घरून जेवण पुरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी सुरेश गडाख, रवी मालुंजकर, परबत नाईकवाडी, भानुदास तिकांडे, महेश नवले, अशोक देशमुख, गुलाब शेवाळे, कचरु शेटे, मीनानाथ पांडे, भीमसेन ताजणे, पोपट दराडे, प्रताप देशमुख, अमित नाईकवाडी, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. इंद्रजित गंभीर, डाॅ. शाम शेटे, रामनाथ मुर्तडक उपस्थित होते.
..
फोटो-१६अकोले कोरोना सेंटर
...
ओळी - अगस्ती आश्रमातील भक्त निवासामध्ये १५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. आमदार डॉ. किरण लहामटे, सीताराम गायकर, ॲड. के. डी. धुमाळ, तहसीलदार मुकेश कांबळे कोविड सेंटरची पाहणी करताना.