कर्जत : शारदानगरी वसाहतीनजीक बंधारा फुटीस कारणीभूत असलेल्या दोषींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास जलसंधारण विभागाने टाळाटाळ सुरू केली आहे.दरम्यान, हा बंधारा फुटल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर जलसंधारण विभागाने त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहून जाणारे पाणी अडविल्याने कर्जतचा पाणी प्रश्न सुटला. त्यामुळे या वसाहतीच्या परिसरातील नागरिकांसह कर्जतकरांनी समाधान व्यक्त करीत ‘लोकमत’ला धन्यवाद दिले. जलसंधारण विभागाने शारदानगरी वसाहतीजवळील बंधाऱ्यासाठी १२ फेब्रुवारी २०१६ रोजी २५ लाख ८ हजार १५४ रुपये मंजूर करून टी. जी. तोरडमल अँड कंपनीस हे काम देण्यात आले. प्रत्यक्षात हे काम दुसऱ्याच ठेकेदाराने केल्याचे सांगितले जाते. प्रशासकीय मान्यतेनंतर तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत होती. पण ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे काम रेंगाळले. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेत जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर संबंधित ठेकेदारास बोलावून त्यास तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. या दुरुस्तीमुळे वाहून जाणारे पाणी थांबवून ठेवण्यात यश मिळाले. लाखो रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या बंधाऱ्याचे काम अजूनही अपूर्ण असल्याचे जलसंधारण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)
बंधारा फुटीप्रकरणी कारवाईकडे कानाडोळा
By admin | Updated: October 16, 2016 01:06 IST