अहमदनगर: जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य स्वस्त होणार आहे़ दुकानदारांना पोहोच धान्य पुरवठा करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून खासगी वाहतूकदाराची नियुक्ती करण्यात आली असून, ठेकेदारामार्फत दुकानदारांना धान्य पुरवठा होणार आहे़ त्यामुळे दुकानदारांचा वाहतुकीवरील खर्च वाचणार असल्याने त्यांच्यासाठीही धान्य स्वस्त होणार आहे़शहरासह जिल्ह्यात लाभार्थींना स्वस्त धान्य पुरविले जाते़ गावातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत हा पुरवठा होत असतो़ जिल्हा प्रशासनाकडून तहसील कार्यालय आणि तहसीलकडून स्वस्त धान्य, दुकान असा प्रवास करत धान्य ग्राहकांपर्यंत पोहोचते़ जिल्ह्यात एक हजार ८०० स्वस्त धान्य दुकाने आहेत़ हे दुकानदार तहसील कार्यालयाकडून धान्य गावात घेऊन जातात़ या वाहतुकीचा खर्च दुकानदारांच्याच माथी मारण्यात आला आहे़ त्यामुळे धान्य स्वस्त असले तरी त्याच्या वाहतुकीचा खर्च मोठा होता़ दुकानदारांचा हा खर्च वाचावा, यासाठी खासगी ठेकेदारामार्फत धान्य दुकानदारांना घरपोहोच करण्यासाठी निविदा प्रसिध्द केली आहे़त्यास प्रतिसाद मिळाला असून, दुकानदारांना संबंधित ठेकेदार धान्याचा पुरवठा करणार आहे़ स्वस्त धान्य दुकानातून अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना धान्याचे वाटप करण्यात येते़ प्रत्येक कार्डसाठी महिन्याला ३५ किलो धान्य देणे बंधनकारक आहे़ जिल्ह्यात ३१ लाख ९५ हजार ६५१ लाभार्थी असून, त्यांना एक हजार ८०० दुकानातून धान्य पुरवठा होतो़़ लाभार्थींची संख्या मोठी असल्याने धान्यही मोठ्याप्रमाणात लागते़ मात्र अलिकडे दुकानदारांना हा व्यवसाय परवडत नसल्याने दुकानदार त्रस्त असून, त्यांच्याकडून राजीनामा दिला जात आहे़ ही स्थिती कायम राहिल्यास बहुतांश दुकाने बंद होतील, त्यामुळे वरील निर्णय घेण्यात आला असून, दुकानदारांसाठी धान्य स्वस्त होणार आहे़प्रशासनाला मिळेना दुकानदारजिल्ह्यातील १२९ गावांतील स्वस्त धान्य दुकान चालविण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती़ चार वेळा जाहिरात प्रसिध्द करूनदेखील प्रतिसाद मिळाला नाही़ शासनाने बचत गटांना दुकान देण्याची अट घातली आहे़ परंतु बचत गट दुकान घेण्यास तयार नाहीत़ त्यामुळे स्वस्त धान्य योजनेपासून ग्रामस्थ वंचित आहेत़ ़जिल्ह्यातील २०७ दुकाने बंदस्वस्त धान्य दुकाने बंद होत आहेत़ जास्त लोकसंख्या असलेल्या गावांत ही दुकाने घेण्यासाठी स्पर्धा लागते़ परंतु छोट्या गावात दुकानदार मिळत नाहीत़ विविध कारणांमुळे २०७ दुकाने बंद असून, ही दुकाने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़स्वस्त धान्य दुकानातून कोणी किती धान्य घेतले,याची माहिती असलेला फलक गावातील चावडीवर लावण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत़ तलाठ्यांना तशा सूचना देण्यात आल्या असून, फलक न लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत़स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य घरपोहोच केले जाणार आहे़ त्यासाठी वाहतूकदाराची नियुक्ती करण्यात येणार आहेत़ या वाहनांवर ठळक अक्षरात स्वस्त धान्य,असे लिहिले असेल़ त्यामुळे स्वस्त धान्य पुरवठा करणारी वाहने सहज लक्षात येतील़- सोपान कासार, जिल्हा पुरवठा अधिकारी
स्वस्त धान्य दुकानदारांसाठी धान्य होणार स्वस्त
By admin | Updated: July 12, 2014 01:10 IST