हेमंत आवारी, अकोले ‘भाऊ, माणसं कस नाळाच्या कुंडाचा पाण्या आणत्यात, हेरला ना? पाण्यवाचुन मरायची बारी.. साठवणीचा गढूळ पाणी, त्या आम्ह्या जगर्या खगर्याने कसा काय पाणी आणायचा.. आणि जनावºहाली कुढ न्यायाचा!’ दुर्गम पाचनई या आदिवासी पाड्यातील इंदुबाई व ठकूबाई भारमल या वयोवृध्द आजींची ही आर्जव.. गावकर्यांची दिवसभर पाणी शोध मोहीम सुरु असते. मैलो गणिक पायपीट करुन प्यायला पाणी आणावे लागते, खडकातून पाणी शेंदताना बादलीला बुड अन् हंड्यांना काठ राहिलेले नाहीत. हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला पाचनई हे आदिवासी गावं,पावसाळ्यात धुवाधार पाऊस अनुभवणार्या गावकर्यांना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. महिन्यापूर्वी गावकर्यांनी टँकरची मागणी केली असून पंचायत समिती, तहसील कचेरीत हेलपाटे मारुन देखील अद्याप टँकर सुरु झालेला नाही. अवकाळी पावसाने साठलेल्या खडकातील डबक्यांचा आधार घेत येथील लोक तहान भागवत आहे. पाण्यासाठी तीन चार मैलाची पायपीट करावी लागत आहे. जनावरांना पाण्यासाठी पाच सहा किलोमीटर न्यावे लागते. खडकविहिरीतून पाणी ओढण्यासाठी रबरी पिशवीचा वापर करावा लागतो त्याला आदिवासी ‘कावळा’ किंवा ‘गिधाड’म्हणतात. पाचनईकर सध्या पाणी टंचाईच्या झळा सोसत असून फणसवाडी पासून दीड दोन मैलावर असलेल्या नाळ्याच्या कुंडा वरुन उभ्या चढणीची पायवाट तुडवत पाणी आणावे लागते. पाषाण दरीतून एकट्या दुकट्याला पाणी काढता येत नाही. किमान तीन- चार जण लागतात. खडकदरीत दोन रांजण खळगे असून त्यांना जोडणारी एक नाळ (छिद्र) असल्याने कुंडाला ‘नाळ्याच कुंड’ म्हणतात.येथील पाणी संपले की त्याच्या खाली मुळानदी पात्राकडे असलेल्या ‘चोंढी’दरीतून पाणी आणावे लागते. येथील पाणी उन्हाळ्यातही आटत नसल्याचे ग्रामस्था सांगतातग़ुरुवारी सायंकाळी आमच्या प्रतिनिधीने गावाला भेट दिली तेव्हा जानकाबाई, नंदाबाई, आशाबाई, नटराज, बारावीत शिकणारी वनीता, सहावीतील ऋषी, पहिलीतला विनायक पाणी आणण्याच्या मोहिमेवर होते. धोकादायक ठिकाण असल्याने दिवसभर कुंडाकडे लक्ष द्यावे लागते. एकट्या दुकट्याला व लहानमुलांना कुंडाकडे जाऊ दिले जात नाही. वेळीच टँकर सुरु होणे गरजेचे आहे. प्रशासन लक्ष देत नाही, असे माजी सरपंच दिलीप भारमल यांनी सांगितले. जवळच असलेल्या पेठ्याच्यावाडीतील आदिवासींना दूरवर असलेल्या ‘चाक’ डोहातून माती मिश्रित पाणी आणावे लागत आहे. तर डोंगराच्या अल्याड असलेल्या आंबित व कोथळे ल. पा. तलावांच्या लाभक्षेत्रातील लव्हाळी गावात काही आदिवासी शेतकर्यांनी उन्हाळी टोमॅटो व भुईमूग पीक घेतले आहे. पाणी टंचाईचे सावट दूर करण्यासाठी ‘शिवकालीन तळे’ खोदले जात असून केवळ खड्ड्याचे काम झाले आहे. कामाच्या दर्जाबाबत गावकरी साशंक आहेत. विठ्ठल भारमल या तरुणाने कामाविषयी तक्रार केली. सध्या तीन गावे, नऊ वाड्यांना चार टँकरने पाणी पुरवठा होत आहे. आज दोन टँकर पंचायत समितीत हजर झाले असून उद्यापासून दुर्गम पाचनई व कुमशेतला टँकर सुरु होईल. बिताका,फोफसंडीला अद्याप टँकर सुरु झाले नाही. - प्रकाश लोखंडे, शाखा अभियंता, टंचाई विभाग.
पाणी शेंदताना बादलीचा बुड अन् हंड्यांचा काठ गेला !
By admin | Updated: May 24, 2014 00:38 IST