काष्टी : जागतिकीकरणाच्या युगात तरुणांना तंत्रशिक्षण हा उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केले. परिक्रमा शैक्षणिक संकुलात आयोजित तंत्रशिक्षण मेळाव्यात अध्यक्षपदावरून पाचपुते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव प्रमोद वायसे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर जि.प. सदस्य व परिक्रमा संकुलाच्या अध्यक्षा प्रतिभा पाचपुते होत्या. नामवंत व्याख्याते व लेखक हेमचंद्र शिंदे, प्राध्यापक विनोद तोडकरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमोद वाकसे यांनी महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाची राज्यातील तंत्रशिक्षणामधील भूमिका स्पष्ट केली. तंत्रशिक्षण मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचीही त्यांनी माहिती दिली. मेळाव्यास श्रीगोंदा तालुक्यातील दहा शाळांमधील दहावी व बारावीचे सुमारे एक हजार विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमास परिक्रमा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सोमशेखर शायले, परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य संजीवन महाडीक, परिक्रमा तंत्रनिकेतनचे प्राचार्य मोहन धगाटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राहिंज हजर होते. ‘परिक्रमा’चे सचिव विक्रमसिंह पाचपुते यांनी आभार मानले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई व परिक्रमा डिप्लोमा इन फामासुर्टिकल सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मेळावा घेण्यात आला. (वार्ताहर)
तंत्रशिक्षणाला उज्ज्वल भवितव्य
By admin | Updated: October 16, 2016 01:01 IST