अहमदनगर : तालुक्यातील नारायणडोह परिसरात पत्नीवर घेतलेल्या चारित्र्याच्या संशयावरून स्वत:च्या लहान मुलाचा गळा आवळून खून केला, तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत तलावात फेकून दिल्याची घटना ८ फेब्रुवारीला घडली होती. या प्रकरणातील आरोपी मुलाचा पिता रतीलाल सोन्याबापू पवार याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. रतीलाल पवार याने झालेले मूल स्वत:चे नाही, अशा संशय घेऊन पत्नी सुनीता हिला माहेराहून ( पाराडी, ता. आष्टी) येथून नारायणडोह येथे आणले. मुलावर औषधोपचार करण्याच्या बहाण्याने त्याने पत्नीला समजावून तलावाजवळ आणले. रतिलाल याने पत्नीला मारहाण करून तिच्या हातातील मूल हिसकावून घेतले. मुलाचा गळा आवळून जीवे मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेतास नॉयलॉन दोरी, तार आणि दगड बांधून तलावात फेकून दिले. आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याने न्यायालयात शरण येणे व जमीन मिळण्याबाबत अर्ज केला आहे. सदर अर्ज जिल्हा न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी फेटाळला आहे. आरोपी व मृत बालकाच्या डीएनए चाचणीसाठी, आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करण्यासाठी आरोपीला कोठडी मिळणे आवश्यक असल्याचा युक्तीवाद अतिरिक्त सरकारी वकील अॅड. रमेश जगताप यांनी केला. तसेच आरोपीचा जामीन नाकारण्यात यावा, हा सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पवार याचा जमीन अर्ज फेटाळला.
मुलाचा खून, पित्याचा जामीन अर्ज फेटाळला
By admin | Updated: June 5, 2014 00:07 IST