अहमदनगर : एप्रिल ते आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चारा म्हणून उसाचा वापर झाला. यामुळे जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या उसापैकी साधारण २५ टक्के ऊस संपला असून त्याचा परिणाम गाळपावर होणार आहे. दरम्यान, येत्या १५ आॅक्टोबरपासून कारखान्याचे बॉयलर पेटणार असून ३० आॅक्टोबरपर्यंत गाळपाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात पारनेर आणि नगर वगळता १४ सहकारी व ६ खासगी असे २० साखर कारखाने कार्यरत आहेत. या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात यंदा पावसाअभावी उसाची टंचाई जाणवणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली असली तरी त्याचा फारसा परिणाम गाळपावर होणार नाही. यंदा पाऊस चांगला झाल्यास पुढील वर्षी उसाचे क्षेत्र वाढणार आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १ लाख २२ हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र गृहीत धरण्यात आलेले आहे. या क्षेत्रातून ७९ लाख ३० हजार मेट्रीक टन गाळप होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आलेला आहे. गेल्या वर्षी विभागात २० कारखान्यांनी केलेल्या गाळपात ९२ लाख ९२ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले होते. त्यावेळी खरिपाच्या सुरूवातीला झालेल्या दमदार पावसामुळे चाऱ्याचा प्रश्न नव्हता, तसेच नवीन लागवड मोठ्या प्रमाणात झालेली होती. यंदा परिस्थिती विपरीत आहे. साधारण जानेवारी ते मार्च या काळात झालेली गारपीट आणि त्यानंतर निर्माण झालेली पाण्याच्या टंचाईचा फटका शेतात उभ्या असणाऱ्या उसाला बसला आहे. ऐन पावसाळ्यात यंदा जनावरांना चाऱ्यासाठी उसाचा वापर करण्याची वेळ आली. यामुळे उपलब्ध उसापैकी सुमारे २५ टक्के ऊस संपला आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी ३७ हजार ९१७ हेक्टरवर आडसाली, ३३ हजार ४०५ पूर्वहंगामी, ४६ हजार ४६३ सुरू आणि ६० हजार २१४ खोडवा आहे. सर्व उसाचे गाळप झाल्यास त्यातून ७९ लाख ३० हजार मेट्रीक टन गाळप होईल असा अंदाज प्रादेशिक सहसंचालक विभागाला आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यात चाऱ्याची भीषण टंचाई आहे. आता पावसाला सुरुवात झाली असली तरी चारा उपलब्ध होण्यास सुमारे महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. (प्रतिनिधी)नगर विभागात असणाऱ्या साखर कारखान्यांकडे किती ऊस शिल्लक आहे. त्यांना गाळपासाठी किती उसाची आवश्यकता आहे, याची माहिती त्यांना येत्या ३० आॅक्टोबरपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. यामुळे येत्या ३० तारखेला जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे गळिताचे चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना त्यांच्या गाळपाची माहिती सादर करावी लागणार आहे.मच्छिंद्र कुसमुडे,कृषी अधिकारी, प्रादेशिक सहसंचालक साखर. परवानगी आवश्यक३१ जुलैला मंत्री समितीच्या बैठकीत ठरलेल्या धोरणानुसार १५ आॅक्टोबरपासून गाळपाला परवानगी देण्यात आलेली आहे. प्रत्येक कारखाना व्यवस्थापनाला यासाठी साखर आयुक्तांची परवानगी आवश्यक करण्यात आलेली आहे. ३० आॅक्टोबरपर्यंत ही परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असून परवानगी न घेता गाळप करणाऱ्या कारखान्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
१५ आॅक्टोबरला धडाडणार बॉयलर
By admin | Updated: August 31, 2014 23:53 IST