अहमदनगर : लग्नास नकार दिल्याने प्रेयसीचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत, तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून जेरबंद केले.
राेहित जालिंदर पाटोळे (२४ रा.फर्याबाग, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात १७ मे रोजी फिर्याद दाखल केली होती. रोहित व त्या मुलीचे एकमेकांवर प्रेम होते. काही दिवसांपूर्वी ते दोघे बाहेर फिरायला गेले होते. यावेळी राेहित याने त्या मुलीचे खासगी फोटो व व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते. काही दिवसांपूर्वी राेहित याने त्या मुलीस लग्नाची मागणी घातली तेव्हा तिने नकार दिला. नकारामुळे संतापलेल्या रोहितने त्या मुलीस व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याने त्या मुलीच्या नावे इंस्टाग्रामवर बनावर अकाऊंट तयार करत, त्यावर मुलीचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीस पुणे परिसरातून अटक केली.