श्रीरामपूर : स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रत्येक शहरातील रस्त्यांवर प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज पडत असल्याने त्यांचा सन्मान राखण्यासाठी केंद्र सरकारने प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घातली आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही बंदी घातली आहे. २६ जानेवारी व १५ आॅगस्टच्या दिवशी विविध सरकारी, निमसरकारी तसेच खाजगी संस्थांमार्फत ध्वजारोहण समारंभ आयोजित केले जातात. राष्ट्रध्वजाविषयीचे आपले प्रेम, निष्ठा, अभिमान दाखविण्यासाठी वैयक्तिकरित्या छोट्या कागदी व प्लॅस्टिक राष्ट्रध्वजांचा वापर होतो. शालेय विद्यार्थी व लहान मुलांसह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर विकले जाणारे हे राष्ट्रध्वज विकत घेतात. हे ध्वज त्याच दिवशी किंवा नंतर इकडे तिकडे रस्त्यावर, जमिनीवर पडलेले दिसतात. प्लॅस्टिकचे ध्वज लवकर नष्ट होत नसल्याने बरेच दिवस जमिनीवरच केरकचऱ्यात पडून राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रप्रतिष्ठेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे समजून केंद्रीय गृह मंत्रालयाने प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वज वापरास बंदी घातली आहे. त्यामुळे प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वज निर्मितीस पायबंद घालण्यासाठी त्याचे उत्पादक, विक्रेते व वितरकांवर सरकारी यंत्रणांनी यथोचित कारवाई करावी, असे आदेश राज्याच्या गृह विभागाने १४ जूनला एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम, १९७१ तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे जनतेच्या वैयक्तिक वापरासाठी छोट्या कागदी ध्वजाचा वापर करावा. पण त्यांचा वापर करताना त्याचा योग्य मान राखावा. असे राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी फेकून देऊ नयेत. राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळल्यास ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करावेत. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी तसेच राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकचा वापर होणार नाही, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)दक्षता घेण्याच्या सूचनाराष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, तसेच त्याचा अवमान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर नागरिकांना आवाहन तसेच जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत पातळी, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आरोग्य संस्था अशा सरकारी व निमसरकारी यंत्रणांमार्फत तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत व स्थानिक पोलीस यंत्रणेच्या मदतीने राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकचा वापर होणार नाही व अशा प्रकारांना आळा बसेल, याची दक्षता घ्यावी.-चारूशीला तांबेकर,सहसचिव, गृहविभाग, महाराष्ट्र राज्य.
प्लॅस्टिक राष्ट्रध्वजांवर बंदी
By admin | Updated: June 21, 2014 00:45 IST