दहा वर्षीय बालिका व तिची आई या दोघीही मतिमंद असल्याने काही वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील पठार भागातील एका गावात आजोळी राहतात. मंगळवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास बालिका घरात दिसून न आल्याने तिचा मामा व कुटुंबातील इतर सदस्यांनी तिचा शोध सुरू केला. ते तिचा शोध घेत असताना घरापासून काही अंतरावर एका शेतात दत्तू डोळझाके हा तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पाहिले. तो पळून जात असताना त्याला पकडण्यात आले. याबाबत गावच्या पोलीस पाटलांना कळविण्यात आले. त्यांनी घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. काळी वेळातच पोलीस तेथे पोहोचल्यानंतर डोळझाके याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दहा वर्षीय बालिकेच्या अंगावर मारल्याचे वळ उठले असून डोळझाके याने मतिमंद बालिकेला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पीडित बालिकेच्या मामाने घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून डोळझाके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करत बुधवारी (दि. २६) न्यायालयात हजर केले असता शुक्रवार (दि. २८) पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी मदने अधिक तपास करीत आहेत.