अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने गुण नियंत्रण योजनातंर्गत जिल्ह्यातील २१ कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १६ कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर ५ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना माफक दरात बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने गुणनियंत्रण योजनेत बियाणे, कीटकनाशके यांच्या दर्जा आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यात येते. यासाठी जिल्हास्तरावर १, तालुकास्तरावर १३ अशी १४ भरारी पथके आहे. ही पथके बियाणे, खते, कीटकनाशके यांचा काळाबाजार रोखण्याचे काम पार पडते. भरारी पथकात १ पूर्ण वेळ आणि ४१ अर्धवेळ निरीक्षक कृषी सेवा तपासणीची मोहीम पार पाडत आहे. जिल्ह्यातील भरारी पथकाने केलेल्या पाहणीत पाथर्डी तालुक्यातील ४ व राहाता तालुक्यातील १ अशा ५ ठिकाणी केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने खताची विक्री होत असल्याचे दिसून आले. यामुळे या ठिकाणी संबंधित कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे परवाना असताना दुकाने कायमस्वरूपी बंद असल्याचे आढळून आलेले संगमनेर १, नेवासा १, श्रीरामपूर १, नेवासा १, श्रीरामपूर १ आणि शेवगाव २ अशा ६ कृषिसेवा केंद्राचे खते, बियाणे, कीटकनाशके यांचे परवाने कायमस्वरूपी बंद करण्यात आले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी विलास नलगे यांनी दिली.एमआरपीपेक्षा अधिक दराने खते, बियाणे यांची विक्री होत असल्यास कृषी विभाग आणि पंचायत समिती विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन नलगे यांनी केले आहे.
२१ कृषी केंद्रांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 01:08 IST