अहमदनगर : सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यातील चार आरोपींना बुधवारी विशेष न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली.
कुख्यात नयन तांदळे टोळीविरोधात पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आरोपी नयन राजेंद्र तांदळे, विठ्ठल भाऊराव साळवे, शाहुल अशोक पवार व अमोल छगन पोटे यांना बुधवारी येथील विशेष मोक्का न्यायालयात हजर केले होते. विशेष न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲड. पुष्पा कापसे यांनी युक्तिवाद केला की, आरोपी विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेली आहे. या गुन्ह्याचा सविस्तर तपास करण्यासाठी आरोपींना जास्तीत जास्त पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. तपासी अधिकारी मिटके यांनीही युक्तिवाद करत आरोपींना जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली.