पंधरा दिवसांपूर्वी शांताबाई पालवे यांना कोरोना झाल्याचे समजले. त्यांचा एचआरसीटीचा स्कोर ८ होता. पुढे गंभीर परिस्थिती उद्भवू नये म्हणून शहरातील अनेक रुग्णालयांत दाखल करण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांनी धावपळ केली. मात्र हॉस्पिटलमध्ये जागा नसल्याने त्यांना निराशा आली. त्यांच्या नातेवाइकांना प्रहार कोविड सेंटरची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ त्यांना सदरच्या कोविड सेंटरमध्ये हलवले. तेथे त्यांच्यावर डॉ. धनंजय गुंड (पारगावकर) यांच्या मार्गदर्शनाखाली वेळीच उपचार झाले. पंधरा दिवसांनंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. पूर्ण बऱ्या होऊन घरी परतताना शांताबाईसह इतर रुग्णांनी डॉक्टर, परिचारिका व नि:शुल्क सेवा देणाऱ्या प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. प्रहारचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अजय महाराज बारस्कर व राज्य प्रवक्ते संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार कोविड सेंटरचे कार्य सुरू आहे.
----------------------------
कोरोनाच्या संकटकाळात माणुसकीच्या भावनेने प्रहारने सर्वसामान्यांना कोविड सेंटरच्या माध्यमातून आधार दिला आहे. गरजू घटकातील रुग्ण येथे उपचार घेत असून, अनेक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शेंडी येथील निसर्गरम्य वातावरणात रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होत आहेत.
- विनोदसिंग परदेशी, जिल्हाध्यक्ष, प्रहार
----------------------------
कोरोना रुग्णांना प्रेमाने मानसिक आधार देण्याची गरज आहे. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू माणून प्रहारची रुग्णसेवा सुरू आहे. संकटकाळात प्रहारने सर्वसामान्यांना जगण्यासाठी बळ व आत्मविश्वास दिला.
- संतोष पवार, राज्य प्रवक्ते, प्रहार