कोतूळ : अकोले शहरासह तालुक्यात धाडसी चोऱ्यांचे सत्र सुरूच असून ब्राह्मणवाडा येथे एका रात्रीत ८ घडफोड्या झाल्याने पोलीस प्रशासनाचे वाभाडे निघाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोले शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांनी बस्तान बसविले आहे. चोरांच्या टोळीने नागरीकांचे जीणे मुश्किल करून सोडले आहे. चोऱ्यांचे सत्र सुरूच असताना पोलिस मात्र ‘अफवा’च्या नावाखाली चोरट्यांनाच अभय देत आहेत. ब्राह्मणवाडा गावातील बाजारपेठेला अज्ञात चोरांच्या टोळीने लक्ष केले. बुधवारी पहाटे डॉ. प्रदीप कुमकर यांच्या संकुलातील हॉस्पिटल, मेडीकल, विकास किराणा दुकानांसह भाडेकरू शिक्षिका सुजल मुळे व नाईकवाडी यांचे घरांचे कुलूप तोडून चोऱ्या केल्या. मात्र नाईकवाडी यांनी घराचा दरवाजा तोडताना आवाज आल्याने त्यांनी कुमकर यांना फोन केला. कुमकर यांनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला, परंतू बाहेरून कड्या लावल्याने त्यांचा नाईलाज झाला.गॅलरीत जावून कुमकर यांनी आरडाओरडा केला असता चोरटे पळून गेले. चोरट्यांच्या अंगात काळे जॅकेट व बरमुडा पॅण्ट होत्या. नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा दुसऱ्या ठिकाणी वळविला. काश्निाथ आरोटे यांचे किराणा दुकान, विजय आरोटे यांचे सोने-चांदीच्या दुकान, यशोदाबाई हांडे यांचे ४ तोळे सोन्याचे दागिने, अनिल आगलावे यांच्या घराचा दरवाजा तोडून मुद्देमाल चोरून नेला. एकूण ८ घरफोड्यांमध्ये सुमारे २ लाखांची चोरी झाल्याचा अंदाज आहे. (वार्ताहर)
ब्राम्हणवाड्यात रात्रीत ८ घरफोड्या
By admin | Updated: September 3, 2014 23:58 IST