नेवासा : तालुक्यातील कुकाणा येथे घरातील कपाट तोडून बावीस तोळे सोन्याचे दागिने, ६५ हजारांची रोकड असा ८ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
याबाबत शामसुंदर धोंडिराम खेसे (रा. कुकाणा, ता. नेवासा) यांनी याबाबत नेवासा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. शामसुंदर खेसे यांचा मुलगा ऋषिकेश याचे २० जून रोजी लग्न असल्याने त्यांच्या घरी मुलगी सोनाली व इतर पाहुणे आलेले होते. शुक्रवारी रात्री १२.३०च्या दरम्यान घरातील सर्वजण कामे आटोपून घराचे दरवाजे बंद करून झोपी गेले होते. त्यानंतर खेसे यांची मुलगी सोनालीला तीनच्या सुमारास जाग आल्यानंतर तिने पाहिले की, घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा आहे. तिने सर्व कुटुंबीयांना उठविले. त्यानंतर घरातील सुटकेस, कपाट उघडून त्यातील साहित्याची उचकापाचक केल्याचे दिसून आले. घरी चोरी झाल्याचे लक्षात आहे. त्यामध्ये १ लाख ६० हजार रुपयांचा चार तोळ्याचा शाहीहार, ३ लाखांचे साडेसात तोळ्याचे दोन गंठण, २ लाखांच्या ५ तोळ्याच्या आठ अंगठ्या, १ लाखाचे अडीच तोळ्याचे झुंबर, दीड लाखाचा तीन तोळ्याचा राणीहार, ६५ हजाराची रोकड असा ८ लाख ८५ हजाराचा ऐवज चोरी गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.