अहमदनगर : गुरूवारी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला असून यात सर्वाधिक ५२ मिमी पावसाची नोंद नगर तालुक्यातील कापूरवाडीत झाली आहे. त्याखालोखाल वांबोरी (ता. राहुरी) या ठिकाणी ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या ठिकाणी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला वेग येणार आहे.गुरूवारी दुपारी जिल्ह्यात काही भागात दमदार पाऊस झाला आहे. यात कापूरवाडीत ५२, वांबोरीत ३५, जेऊर २५, माणिकदौंडी (ता. पाथर्डी) १९, आणि शिबलापूर (ता. संगमनेर) १२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ज्या ठिकाणी हा पाऊस झालेला आहे. ती जिल्ह्याच्या चारही कोपऱ्यातील ठिकाणे आहेत. यामुळे ज्या ठिकाणी पावसाला सुरूवात होत आहे. त्याच ठिकाणी कोसळत आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी अद्यापही पेरणीलायक पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाचे आगार असणाऱ्या अकोले तालुक्यात आतापर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी आणि आदिवासी बांधव अडचणीत सापडलेले आहेत. तालुक्यातील आठ महसूल मंडळापैकी साकीरवाडी मंडळात अवघी १ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. तर विरगांव मंडळात सर्वाधिक ४६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. यावरून दुष्काळी परिस्थितीचा अंदाज येत आहे.जिल्ह्यातील ९५ महसूल मंडलापैकी १५ ठिकाणी पावसाने शंभर मिमीचा टप्पा ओलांडला आहे. यात सर्वाधिक जामखेड तालुक्यात १६२.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच तालुक्यात उर्वरित तीन मंडलातही शंभर मिमीच्या पुढे पाऊस झालेला आहे.
कापूरवाडीत ५२ मिलीमीटर पाऊस
By admin | Updated: July 12, 2014 01:10 IST