निंबळक : कामरगाव (ता.नगर) येथील ग्रामस्थांनी भाळवणी (ता.पारनेर) येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरास (कोविड सेंटर) ५१ पाेती धान्य मदत म्हणून दिले. हे धान्य नुकतेच आमदार नीलेश लंके यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. गावातील काही कष्टकरी, गरजूंनी अगदी रेशनकार्डवर मिळालेले धान्यही दिले.
गावातील लंके प्रतिष्ठान, ग्रामपंचायत, आजी-माजी सैनिक संघटनेने मूठभर धान्य गरजूंसाठी हा उपक्रम राबविला. ग्रामस्थांनी गावातून मदत फेरी काढली. यावेळी गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी आदी ५१ पोती धान्य जमा झाले. यात काही ज्येष्ठ नागरिक, निराधार, कष्टकरी, सर्वसामान्य आदींनी रेशनचे मिळालेले काही धान्यही दिले.
लंके म्हणाले, कामरगावच्या ग्रामस्थांनी राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. तसेच त्यांनी त्यांच्या गावात नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने लोकसहभागातून सुरू केलेले कामक्षा माता आरोग्य मंदिराचे कामही इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे.
यावेळी आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ठोकळ, ग्रामपंचायत सदस्य संदीप ढवळे, ॲड. प्रशांत साठे, नीलेश लंके प्रतिष्ठानचे चास गणप्रमुख सिद्धांत आंधळे, सरपंच तुकाराम कातोरे, माजी उपसरपंच अनिल आंधळे, राम नानेकर, राजेंद्र मथुजी आंधळे, सुयोग भुजबळ, सुरेश सोनवणे, कैलास पाडेकर, सतीश आंधळे आदी उपस्थित होते.
---
फोटो ओळी..
कामरगावच्या ग्रामस्थांनी ५१ पोती धान्य भाळवणीच्या कोविड सेंटरला भेट दिले.