अहमदनगर : औद्योगिक वसाहतींना जमिनी देण्यास शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध होतो़ त्यामुळे नगरचा औद्योगिक विकास खुंटला आहे़ मात्र सुपा एमआयडीसी वाघुंडे येथील शेतकऱ्यांनी आपली जमीन उद्योगाला देण्याची तयारी दर्शविली असून, पहिल्या टप्प्यात ६२ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करणे प्रशासनास शक्य होणार आहे़ भूसंपादनाच्या बदल्यात शेतकऱ्यांना प्रती एकर २० लाख रुपये मोबदला दिला जाणार आहे़नगर शहरासह जिल्ह्यात चार मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत़ औद्योगिक वसाहतीत नागापूर, श्रीरामपूर, सुपा- पारनेर आणि नेवासा येथील वसाहतींचा समावेश आहे़ सुपा- पारनेर व नेवासा औद्योगिक वसाहत नव्याने स्थापन करण्यात आली आहे़ या दोन्ही औद्योगिक वसाहतीतील भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे़ औद्योगिक विकास महामंडळाने सुपा- पारनेर औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला़ नव्याने पाच गावांतील ९२७ हेक्टर जमीन संपादीत करण्याचा आदेश २० जानेवारी २०१४ रोजी जारी करण्यात आला आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुपा परिसरातील बाबुर्डी, वाघुंडे बुद्रुक, म्हसणे, सुलतानपूर आणि पळवे खुर्द गावांतील जवळपास ३५० शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या़ सुरुवातीला शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास कडाडून विरोध केला़ प्रशासन व शेतकऱ्यांचा वाद निर्माण झाला होता़ त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया थंडावली़ शासनाने भूसंपादनाच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात मोठी वाढ केली़ प्रती एकर २० लाख रुपये मोबदला देण्याचा निर्णय जाहीर केला़ तत्कालीन जिल्हाधिकारी संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शेतकऱ्यांना नव्याने दिल्या जाणाऱ्या मोबदल्याची माहिती देण्यात आली़ त्यावेळी काही शेतकऱ्यांनी आणखी मोबदल्याची मागणी केली़ तर काहींनी जमीन देण्याची तयारी दर्शविली होती़ बैठकीनंतर शेतकऱ्यांकडून हारकती मागविण्यात आल्या़ प्राप्त हारकतींवर सुनावणी घेण्यात आली असून, वाघुंडे गावातील ५० शेतकऱ्यांनी एमआयडीसीला जमीन देण्यास तयार झाले आहेत़ त्यांनी जिल्हा प्रशासनास संमतीपत्र दिले असून,त्यावर पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे़वाघुंडे गावातील २८५ हेक्टर ६२ आर. जमीन संपादीत करण्यात येणार आहे़ पहिल्या टप्प्यात ५० शेतकरी तयार झाले असून, त्यांच्याकडील ६२ हेक्टर २८ आर क्षेत्र संपादीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ जमीन देण्याची तयारी दर्शविणाऱ्या वाघुंडे येथील शेतकऱ्यांना त्याबदल्यात २६ कोटी ६० लाख ५० हजार रुपये मोबदला दिला जाणार आहे़ तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)
सुपा एमआयडीसीला जमीन देण्यास ५० शेतकऱ्यांची संमती
By admin | Updated: September 3, 2014 23:57 IST