तळेगाव दिघे : जनावरांचे मांस घेवून जाणारा मालवाहू ट्रक पेटवून पोलीस व अग्नीशामक दलाच्या वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी तळेगाव दिघे व चिंचोली गुरवमधील एकूण २४ तरूणांविरूध्द तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. सर्वांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांची माहिती अशी, सोमवारी सायंकाळी मालवाहू ट्रक (क्रमांक एम.एच.४१, जे.७२०६) मधून नांदुर शिंगोटे- तळेगाव दिघे रस्त्यावरून जनावरांचे मांस नेले जात असल्याची माहिती काही तरूणांना समजली. दुर्गंधी येत असल्याने काही तरूणांनी सदरचा ट्रक तळेगावनजीक अडविला. ट्रकमध्ये मांस पाहून संतप्त झालेल्या तरूणांच्या जमावाने चालक व क्लिनरला खाली उतरवून जबर मारहाण केली. त्यानंतर ट्रक पेटवून देण्यात आला. घटनेची माहिती समजताच तालुका पोलीस अग्नीशामक दलाच्या वाहनासह घटनास्थळी पोहचले. मात्र समाजाने अग्नीशामक व पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. त्यात अग्नीशामक दलाच्या वाहनाच्या काचा फुटल्या. काही पोलिसांना मारहाण झाली. वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मंगळवारी पोलिस हेड कॉन्स्टेबल अशोक विश्वनाथ जांभूळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दिलीप दिघे, विकास दिघे, दीपक भागवत, निलेश दिघे, रामनाथ भागवत, प्रशांत क्षीरसागर, गोविंद दिघे, नवनाथ रहाणे आदींसह एकूण २४ जणांविरूध्द दंगल, मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली. दुपारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (वार्ताहर)
मालट्रक पेटविणाऱ्या २४ तरूणांना अटक
By admin | Updated: April 26, 2024 11:16 IST