सोनई : सोनई (ता. नेवासा) येथे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना मदत म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आवाहनानंतर गावातील विविध मंडळांच्या प्रयत्नातून झालेल्या शिबिरात १०५ युवकांनी रक्तदान केले.
जिल्ह्यात सध्या अनेक कोरोनाबाधित रुग्णांना रक्ताची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शंकरराव गडाख युवा मंच, स्नेह फाउंडेशन, राजस्थानी युवा मंच, महेश तरुण मंडळासह गावातील विविध मंडळांनी सहभाग नोंदवत शिबिर यशस्वी केले. महादेव मंदिर परिसरात कोरोना नियमांचे पालन करत शिबिर घेण्यात आले.
नगरच्या आनंदॠषीजी ब्लड बंकेचे डाॅ. सुनील मुनोतसह आरोग्य पथक शिबिरासाठी उपस्थित होते. सोनईचे सरपंच धनंजय वाघ, पत्रकार विनायक दरंदले, महावीर चोपडा, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सामाजिक कार्यकर्ते नितीन दरंदले यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कोरोना संसर्गाच्या काळात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सोनईतील रक्तदात्यांचा सहभाग सर्वाधिक आहे, असे ब्लड बँकेच्या वैद्यकीय पथकाने सांगितले.