अहमदनगर : गुरूकुल शिक्षक मंडळाने सुरू केलेली नेत्रदानाची चळवळ सामाजिक क्रांती करणारी ठरणार आहे. या उपक्रमामुळे अनेक अंधांना दृष्टी मिळणार असून त्यांच्या जीवनात उजेड येणार असल्याचे प्रतिपादन सिनेट सदस्य प्रशांत गडाख यांनी केले.शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाजार समितीच्या सभागृहात आयोजित नेत्रदान संकल्प सोहळ्यात गडाख बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. कळमकर होते. गडाख म्हणाले की, समाजात नेत्रदाना विषयी अनेक गैरसमज आहेत. मात्र, शिक्षकांनी त्याविषयी उद्बोधन करणे आवश्यक आहे. यामुळे नेत्रदान चळवळीला गती मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.डॉ. कळमकर यांनी गुरूकुल मंडळ केवळ राजकारण करत नाही. मंडळाच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम करणारे मंडळ आहे. मंडळाने सुरू केलेली ही चळवळ भविष्यात अखंडपणे सुरू ठेऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या ठिकाणी १०१ शिक्षकांनी नेत्रदानाचे संमतीपत्र भरून दिले.सूत्रसंचालन सुदर्शन शिंदे यांनी केले. प्रास्ताविक संजय कुलकर्णी यांनी केले. आभार राजेंद्र जायभाय यांनी मानले. कार्यक्रमाला संजय धामणे, अनील आंधळे, राया औटी, नितीन काकडे, शिवाजी दुशिंग, राजेंद्र ठाणगे, मच्छिंद्र दळवी, अंबादास पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
१०१ शिक्षकांनी केला नेत्रदानाचा संकल्प
By admin | Updated: June 30, 2014 00:34 IST