- प्रा. डॉ. यशवंत पाटील
प्राप्त परिस्थितीत स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबाचा, समाजाचा नेकीने, सचोटीने आचारविचार आणि व्यवहार करून विकास साधणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. पण याच्याही थोडे पलीकडे पाहण्याचा विचार करून तशी कृती करण्याला ‘अध्यात्मिक आचरण’ म्हणता येईल. यात बहुजन सुखाय, बहुजन हिताय ही आचारविचारधारा अपेक्षित असते.
स्वत: सुखी-समृद्ध होणे, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही. परंतु इतरांसाठीही काही करण्यास प्रेरणा देणारी कै. दत्ता हसलगीकरांची कविता अध्यात्मिक आचरणाला बळ देणारी ठरेल.
‘ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत,
ज्यांचे स्वर जुळून आले, त्यांनी गाणी गावीत,
आभाळाएवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे,
मातीत ज्यांचे जन्म मळले, त्यांना थोडे उचलून घ्यावे,
जे आहेत रंजले गांजले, त्यांना आपले म्हणावे.’
स्वत:ची कुशलता, कठोर परिश्रम, बुद्धीचातुर्य, काल-सुसंगतता आदि वापरून स्वत:चा विकास साधण्यास कुणाचीच हरकत नसते. पण यात इतरांच्याही सुखासमाधानाचा, आनंदाचा विसर पडू नये. हा मनोभाव महत्त्वाचा आहे. पण यशाच्या उन्मादात कधीकधी संत कबिरांनी वर्णन केलेल्या खजुराच्या झाडासारखी अवस्था होते.
‘बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेंड खजूर ।
पंथीयों को छाया नाही, फल लगे अती दूर।।’
खजुराच्या झाडासारखे मोठेपण, संपन्नता काय कामाची? वाटसरूला भूक लागली तर ती भूक भागविण्यासाठी त्याला खजूरही मिळत नाही. कारण खजुराचे झाड उंच असते. त्याला फांद्याचा विस्तारही फारसा नसतो. अशा या खजुराच्या झाडाच्या छायेत बसावे तर वाटसरूला सावलीही मिळत नाही, असे मोठेपण काय कामाचे?
अध्यात्मिक आचरणात व्यक्तीचं मोठेपण ती व्यक्ती इतरांच्या भल्यासाठी कशी जगली यात आहे. स्वत:च्या घरावर तुळशीपत्रं ठेवून जगणे हे येथे अपेक्षित नाही. पण भुकेलेल्याची भूक, तहानलेल्याची तहान जाणणे, त्यासाठी शक्य तेवढा प्रयत्न करणे यालाच ‘अध्यात्मिक आचरण’ म्हणता येईल. भलेही ती व्यक्ती मठ, मंदिर, चर्च, गुरुद्वारा वा अन्य धार्मिक स्थळावर जात असो अगर नसो.