- प्रा. डॉ. यशवंत पाटील
मनाचे भरण-पोषण सुव्यवस्थित होणे हे आरोग्यदायी, आनंदी जीवन शैलीसाठी आवश्यक आहे. त्यासाठी थॉमस् अल्वा एडिसनने सांगितलेली ‘प्रार्थना’ मनाचे उत्तम पोषण करणारी आहे. तो म्हणतो, ‘हे परमेश्वरा ! मला रक्ताबद्दल अतिशय घृणा आहे. पण काय करणार? माझ्या शरीरात रक्त असल्याचे ‘वास्तव’ मला स्वीकारावेच लागेल. हे रक्त माझ्या शरीरातील नसानसातून वाहात आहे. मला ते बदलता येणे शक्य नाही. म्हणून मला जे बदलता येणे शक्य नाही ते बदलण्याची शक्ती दे. जे बदलणे माझ्या हातात नाही ते स्वीकारण्याचे मला शहाणपण दे. आणि हो या दोहोमधला फरक समजण्याची हुषारी मला द्यायला विसरू नकोस.’
वास्तव स्वीकारण्याचा, त्याकडे तटस्थतेने, डोळसपणे बघण्याची ‘मनाल सवय’ लावणे आवश्यक आहे. अनेकदा काही दु:खद प्रसंग, आपत्ती आदी टाळणे अथवा बदलणे आपल्या आवाक्यात वा हातात नसते. तेव्हा ते सारे वास्तव मानसिक पातळीवर समजून घ्यावयास हवे. आवाक्यात वा हातात नसलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे वा पाठ फिरविणे अंतिमत: सुखकारक असते. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद कुलकर्णी लिहितात, ‘हे परमेश्वरा ! जे शक्य आहे, निर्धार दे ते करावया, जे टाळणे अशक्य आहे, दे शक्ती ते सहाया, काय शक्य, काय अशक्य ते मज कळाया सजग मन आणि बुद्धी दे.’’
पोषणासाठी जसा सकस आहार आपण घेतो, तसेच मनाच्या भरण-पोषणासाठी वरील ‘प्रार्थना’ सूत्राचा आधार घ्यावयास हवा. रामदास स्वामी यासाठी मनाला ‘भक्ती’ पंथाला लावण्याचा सल्ला देतात. संत तुकाराम ‘मन करारे प्रसन्न’ असे सांगतात. नितीमत्तेने वित्त मिळवून चित्त (मन) स्थिर, शांत ठेवावयास सुचवितात. यासारख्या उपायातून मनाच्या पोषणाचे महत्त्व अधोरेखित होते.