दुचाकी चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, १९ दुचाकी जप्त; सांगली शहर पोलिसांची कामगिरी

By घनशाम नवाथे | Published: May 4, 2024 10:00 PM2024-05-04T22:00:31+5:302024-05-04T22:01:14+5:30

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित विजय, मुऱ्याप्पा आणि अन्सार या तिघांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत चोरलेल्या दुचाकी महाराष्ट्र-कनार्टक सीमा भागात बाँड पेपरवर तसेच रोखीने कमी किमतीत विक्री करण्याचा उद्योग सुरू केला होता.

Interstate gang of two-wheeler thieves jailed, 19 bikes seized; Performance of Sangli City Police | दुचाकी चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, १९ दुचाकी जप्त; सांगली शहर पोलिसांची कामगिरी

दुचाकी चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, १९ दुचाकी जप्त; सांगली शहर पोलिसांची कामगिरी

सांगली : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी चोरून त्याचा इंजिन व चेसीस क्रमांक खोडून विक्री करणारी टोळी सांगली शहर पोलिसांनी जेरबंद केली. टोळीतील विजय पुंडलिक माने (वय ४०, रा. उमाजी नाईकनगर, दानोळी, ता. शिरोळ), मुऱ्याप्पा नरसिंग हाबगोंडे (वय ३७, रा. जिरग्याळ, ता. जत), अन्सार अक्रम बुराण (वय २१, रा. एपीजे अब्दुल कलाम चौक, कागवाड, जि. बेळगाव) तिघांकडून १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित विजय, मुऱ्याप्पा आणि अन्सार या तिघांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत चोरलेल्या दुचाकी महाराष्ट्र-कनार्टक सीमा भागात बाँड पेपरवर तसेच रोखीने कमी किमतीत विक्री करण्याचा उद्योग सुरू केला होता. दुचाकीच्या इंजिन व चेसीस क्रमांकावर ग्राईंडर फिरवून क्रमांक खोडून दुचाकी विक्री करत होते. तिघांच्या टोळीने अशा अनेक दुचाकी विक्री केल्या होत्या. तिघे जण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी सांगलीतील आकाशवाणी केंद्राजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील संतोष गळवे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन पाहणी केली. तेव्हा तिघे जण मोपेड (एमएच १० एपी ९३५६) घेऊन थांबल्याचे दिसले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दुचाकी चोरून त्या विक्री करत असल्याची कबुली दिली. उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने खोलवर तपास करत चोरीस केलेल्या आणखी १९ दुचाकी जप्त केल्या. या जप्त केलेल्या दुचाकी कोठून चोरल्या त्याचा तपास केला जात आहे.

गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार संदीप पाटील, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, रफीक मुलाणी, संतोष गळवे, गौतम कांबळे, गणेश कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, उपअधीक्षक जाधव यांनी या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

‘शहर पोलिसांनी टोळी पकडून १९ दुचाकी जप्त करण्याची मोठी कामगिरी केली आहे. यापुढेही या पथकाने उकल न झालेले गुन्हे उघडकीस आणावेत. तसेच नागरिकांनी दुचाकीला डबल लॉक, सुरक्षित ठिकाणी पार्किंग करावी.’
-संदीप घुगे, पोलिस अधीक्षक, सांगली

Web Title: Interstate gang of two-wheeler thieves jailed, 19 bikes seized; Performance of Sangli City Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.