VVMC Election Result 2026: वसईत जागा घटल्या पण हितेंद ठाकूरांनी गड राखला; भाजपाची कडवी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:44 IST2026-01-16T16:42:53+5:302026-01-16T16:44:32+5:30
Vasai Virar Municipal Corporation Election Result 2026: वसई विरार मनपा निवडणुकीत शिंदेसेनेला एक जागा मिळाली असून, उद्धवसेना आणि काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही.

VVMC Election Result 2026: वसईत जागा घटल्या पण हितेंद ठाकूरांनी गड राखला; भाजपाची कडवी झुंज
Vasai Virar Municipal Election Result 2026: वसई-विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधानसभा निवडणुकीत पिता-पुत्रांना पराभवाचा मोठा धक्का बसला होता. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी पक्ष महानगरपालिका निवडणुकीत तरी सत्ता कायम राखणार की, भाजपा सत्तापालट करण्यात यशस्वी ठरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. परंतु, राजकीय चर्चांना छेद देत हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरार महानगरपालिकेत सत्ता राखली आहे. भाजपाने कडवी झुंज दिली असली तरी सत्ता मिळण्यात यश आलेले नाही.
विधानसभा परिषदेत वसई आणि नालासोपारा येथे भाजपाचे आमदार विजयी झाले. त्यामुळे या भागात भाजपाचे पारडे चांगलेच जड मानले जात होते. यावेळेस ठाकूरांचा गड खालसा करायचा, असा चंग बांधून भाजपा मैदानात उतरले होते. बहुजन विकास आघाडीचे अनेक नेते, पदाधिकारी भाजपामध्ये सामील झाले होते. असे असले तरी कुणी कितीही आव्हान देऊ दे, पक्षातून कितीही माणसे जाऊ देत, असा विश्वास हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला होता. तोच खरा होताना पाहायला मिळाला.
वसई-विरार मनपात बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत
वसई विरार महानगरपालिकेत ११५ जागांवर निवडणूक झाली. यामध्ये बहुजन विकास आघाडीला ७१ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपाला ४४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिंदेसेनेला एका जागेवर विजय मिळाला असून, उद्धवसेना, काँग्रेस यांना एकही जागा जिंकता आलेली नाही. सुमारे १० वर्षांनी वसई-विरार पालिकेची निवडणूक झाली.
दरम्यान, वसई विरार महापालिकेत २९ प्रभागांतील ११५ जागांसाठी ५४७उमेदवार रिंगणात होते. यापैकी ३८६ उमेदवार हे विविध राजकीय पक्षांचे होते, तर त्यांना टक्कर देण्यासाठी १५६ अपक्ष रिंगणात होते. वसई विरार मनपा निवडणुकीतही प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून आयारामांना किंवा इतरांना संधी दिल्याने अनेक नाराजांनी बंडाचा झेंडा फडकवीत निवडणुकीत आव्हान उभे केले आहे.