नालासोपाऱ्यात 10 वर्षांत फेरीवाल्यांसाठी झोन नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 01:23 AM2020-11-26T01:23:20+5:302020-11-26T01:23:37+5:30

फेरीवाल्यांमध्ये नाराजी ; मनपाची रणनीती नाही, प्रस्ताव रखडलेलाच

Nalasopara has no zone for peddlers in 10 years | नालासोपाऱ्यात 10 वर्षांत फेरीवाल्यांसाठी झोन नाहीच

नालासोपाऱ्यात 10 वर्षांत फेरीवाल्यांसाठी झोन नाहीच

Next

मंगेश कराळे

नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेची स्थापना होऊन १० वर्षे उलटली, तरी नालासोपा-यातील फेरीवाल्यांचा प्रश्न काही मिटलेला नाही किंवा त्यांच्यासाठी कोणतीही रणनीती आखलेली नाही. फेरीवाल्यांसाठी वसई-विरार मनपाने नालासोपा-यात फेरीवाला झोन बनवलेलाच नाही. सरकारी, आरक्षित जमिनींवर विविध बांधकामे होतात, पण फेरीवाला झोन का बनत नाही. या फेरीवाल्यांकडून महापालिकेला मोठा महसूल मिळतो, तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष आणि वेळप्रसंगी कारवाई का होते? की त्यामागेही कोणते राजकारण आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नालासोपारा पूर्वेकडे ज्यावेळी नगर परिषद होती, त्यावेळी ३ जुलै १९९८ ला एक प्रस्ताव पास करून चंदननाका, सेंट्रल पार्क आणि एसटी डेपो येथे अस्थायी स्वरूपात तीन ठिकाणी फेरीवाला झोन बनवले होते. त्यावेळी नालासोपा-यात फेरीवाल्यांची संख्या अंदाजे ४००च्या जवळपास होती. वाढत्या लोकसंख्येमुळे आता फेरीवाल्यांची संख्या जवळपास ५०००हजार इतकी झाली आहे. फळे, फुले, भाजी, हार, कपडे, गृहोपयोगी वस्तू, सौंदर्यप्रसाधने, कटलरी अशा जवळपास सर्वच वस्तू अनेक व्यापारी रस्त्यावर विकून आपले घर चालवतात. 

नालासोपा-यात सरकारी आणि आरक्षित जमिनीवर अनधिकृत इमारती बनवत आहेत, पण यापैकी कोणत्याही जागेवर फेरीवाला झोन मनपा का बनवत नाही, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे. नालासोपारा पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील जे काही मुख्य रस्ते आणि त्या अंतर्गत जे काही रस्ते आहेत, त्यावर अनेक फेरीवाले बसून आपला व्यवसाय करतात. परिणामी वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो.
मनपाचे अतिक्रमण विभाग फेरीवाल्यांवर कारवाई करून गाड्या जप्त केल्या जातात. दुकाने जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकतात. पण, यांच्याकडूनच मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. पण, यांच्यासाठी फेरीवाला झोन का बनवत नाही? यातही काही राजकारण आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

फायलीत बंद 
१०४ मार्केट झोन
फेरीवाल्यांच्या समस्या पाहून दोन वर्षांपूर्वी मनपाने हद्दीतील प्रभागात १०४ मार्केट झोन बनविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण, दोन वर्षे होऊनही प्रस्ताव अजून फायलीत बंद आहे. असा ठराव महासभेत २०१८ किंवा २०१९ साली झाला होता, पण अद्याप काही झाले नसल्याचे माजी नगरसेवकाने लोकमतला सांगितले.
 

आम्ही मागील १५ वर्षांपासून रस्त्यावर भाजी विकून पोट भरतो. मनपाचा रोड टॅक्स आणि कर भरतो, मग मनपा फेरीवाला झोन का बनवत नाही?
- राजेंद्र यादव, भाजीविक्रेता

जास्त फेरीवाले हे परप्रांतीय आहेत, म्हणून मनपा फेरीवाला झोन बनवत नाही की काय, असा आम्हाला आता संशय येतो. निवडणुकीमध्ये मतदानाच्या वेळी मतदार म्हणून आमचा वापर करतात. पण, निवडणुका झाल्या की, आम्हाला परत रस्त्यावर सोडतात.
    - भारती गुप्ता, भाजीविक्रेती

मनपाला प्रस्ताव दिला होता, पण काही  तांत्रिक अडचणी होत्या म्हणून परत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. नंतर तो प्रस्ताव प्रभाग समितीनिहाय ठरावात येणे अपेक्षित होते पण तो आला नाही. निवडणुका आणि कोरोनामुळे हा प्रस्ताव झालेला नाही.
- संजय हिणवार, फेरीवाला पथकाचे अधिकारी, वसई विरार महानगरपालिका) 

 

Web Title: Nalasopara has no zone for peddlers in 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.