maharashtra election 2019 'Sakhi' Polling Booth in vasai | महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वसईतील "सखी मतदान केंद्र" मतदार राजासाठी सजले

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वसईतील "सखी मतदान केंद्र" मतदार राजासाठी सजले

आशिष राणे

वसई - पालघर जिल्ह्यातील खास करून वसई -133 मतदारसंघातील महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या प्रमाणे राज्य विधानसभा निवडणुकीतही ‘सखी’ मतदान केंद्राची स्थापना केली आहे. दरम्यान वसई -133 या मतदारसंघात सांडोर गावच्या हद्दीत मतदान केंद्र क्रं.116 या नेट्रोडेम इंग्लिश स्कुलमध्ये खोली क्रं.1 व संपूर्ण परिसरात हा आकर्षक ‘सखी बूथ’ तयार करण्यात आला आहे.

सखी केंद्र म्हणजे महिलांसाठी विशेष सेवा असल्याने या ठिकाणी मतदार राजा आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आकर्षित होण्यासाठीचा उद्देश आहे, आणि यासाठी इथे अधिकाधिक आकर्षक व  फुलांची सजावट, रांगोळी काढून स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आल्याची माहिती वसई विधानसभेचे सहा.निवडणूक अधिकारी तथा वसई तहसीलदार किरण सुरवसे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

निवडणुकीत महिलांचे, महिलांनी महिलांसाठी चालविलेले ‘सखी मतदान केंद्र’ ही प्रथम केंद्रीय निवडणूक आयोगाची संकल्पना आहे. आणि आता राज्यात ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र करण्यात आले आहे. या मतदान केंद्रात पाच अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले जातात. त्यानुसार सखी मतदार केंद्रांवर नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी या सर्व महिलाच असतात. त्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सहायक, कर्मचारी यांचा समावेश असतो. त्याशिवाय पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वेगळी असते. एकूणच दोन महिन्यांपूर्वी संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत या बहुचर्चित सखी मतदान केंद्राला महिला मतदारांचा चांगला व उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 

वसई सहा.निवडणूक अधिकारी म्हणाले की, सांडोर मधील मतदान केंद्र क्रं.116 याचे जुने मतदान केंद्र म्हणून आधी तलाठी कार्यालय, सांडोर होती मात्र बाजूलाच ही शाळा प्रशस्त, सुंदर व स्वच्छ अशी पाहणी केल्यावर याठिकाणी सखी केंद्र आकर्षित ठरू शकते आणि तसे करून वसई-133 विधानसभेसाठी आम्ही तिची स्वेच्छेने निवड केली आणि त्यास मतदान केंद्र क्रं.116 मधील खोली नं.1 या नेट्रोडेम इंग्लिश स्कूल हे सांडोर  गावातील महत्त्वाचे केंद्र म्हणून नवीन मतदान केंद्र म्हणून घोषित करून 'सखी मतदान केंद्र' म्हणून निवडले आहे. 

अर्थातच महिलांसाठी विशेष सेवा असल्याने या केंद्रात आवश्‍यक त्या सुविधा पुरविल्या गेल्या असून विविध प्रकारची फुले, रांगोळ्या, गालिचे,फुगे, रंगीबेरंगी बोर्ड, आदरव्यक्त करणारे संदेश फलक आदी लावून हे मतदार केंद्र बहुरंगी सजविण्यात आले असून मतदार राजा नक्कीच या आयोगाच्या सखी केंद्र संकल्पनेचे स्वागत करेल असा प्रबळ आशावाद शेवटी वसई-133 चे सहा निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार किरण सुरवसे यांनी व्यक्त केला.
 

Web Title: maharashtra election 2019 'Sakhi' Polling Booth in vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.