Thane mayor: महापौर शिंदेसेनेचा, उपमहापौर भाजपाचा; दोन्ही पक्षांनी कोणाला दिली संधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:22 IST2026-01-30T18:19:52+5:302026-01-30T18:22:18+5:30
ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिंदेसेनेचा महापौर असणार आहे, तर भाजपाला उपमहापौरपद देण्यात आले आहे.

Thane mayor: महापौर शिंदेसेनेचा, उपमहापौर भाजपाचा; दोन्ही पक्षांनी कोणाला दिली संधी?
ठाणे महापालिकेत बहुमत मिळालेल्या महायुतीने अखेर आपले पत्ते उघडले. कोणाचा महापौर बसणार आणि उपमहापौर पद कोणाला मिळणार, याबद्दल आता चित्र स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेकडून महापौर पदासाठी, तर भाजपाकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी शिंदेसेनेकडून एक तर उपमहापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून एक असे उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती महापालिका सचिव मनीष जोशी यांनी दिली.
शिंदेसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी महापौर पदासाठी, तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांनी उपमहापौर पदासाठी आज (३० जानेवारी) आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह पक्षाचे गटनेते, नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
महापौर व उपमहापौर पदांसाठीची निवडणूक प्रक्रिया ३ फेब्रुवारी २००२६ रोजी सकाळी ११.३० वाजता महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडणार आहे.
या निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ उपस्थित राहणार असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार आहे.