कल्याण ग्रामीणमध्ये अटीतटीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 01:09 AM2019-10-20T01:09:07+5:302019-10-20T05:16:12+5:30

Maharashtra Election 2019: बदल की पुनरावृत्ती याकडे लक्ष; वाहतूककोंडी, पाणीप्रश्न समस्या

Maharashtra Election 2019: Conditional Fighting in Kalyan Rural | कल्याण ग्रामीणमध्ये अटीतटीची लढत

कल्याण ग्रामीणमध्ये अटीतटीची लढत

Next

- मुरलीधर भवार 

कल्याण : ग्रामीण मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्याची सांगता होण्यास अवघे काही तासच उरले आहेत. या मतदारसंघातील २७ गावे, वाहतूककोंडी, आरोग्याच्या समस्या आणि पाणीप्रश्न या मुद्द्याभोवती निवडणूक प्रचार दोन्ही उमेदवारांकडून करण्यात आला आहे. या मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार बदलला आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध मनसेच्या लढाईत कोण विजयी होणार, याकडे लक्ष लागले आहे.

मतदारसंघात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावे, नवी मुंबईतून वगळलेली १४ गावे, दिवा यांचा समावेश आहे. मतदारसंघातून केवळ दोनच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेतर्फे रमेश म्हात्रे व मनसेतर्फे राजू पाटील हे निवडणूक लढवत आहेत. या दोनच उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. निवडणुकीत उमेदवारी जाहीर होताच मनसेचे उमेदवार पाटील यांनी भव्य असे निवडणुकीचे कार्यालय सुरू केले आहे. त्यांना शह देण्यासाठी शिवसेनेचे म्हात्रे यांनी त्याच धर्तीवर सागाव येथे प्रचाराचे कार्यालय सुरू केले. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांनी पाच वर्षांत मतदारसंघात कामे केली.

मात्र, शिवसेनेच्या म्हात्रे गटाकडून भोईर यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला गेल्याने शिवसेनेने ऐनवेळी उमेदवारी बदलून ती म्हात्रे यांना दिली. शिवसेनेतील बंडाळी पक्षाने शमवल्याने बंडखोरी टळली. तसेच भोईर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत म्हात्रे यांचे काम करण्याचे आश्वासन दिले. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा आदेश व शिस्त पाळा, असे बजावून शिवसेनेचे उमेदवार म्हात्रे यांच्यासाठी एकदिलाने काम करा, असे आवाहन केले. प्रचारात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हात्रे यांनी भेटीगाठींवर विशेष भर दिला. तसेच त्यांनी प्रचाराची जोरदार सुरुवात केली. मात्र, त्यांच्यासाठी कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकही प्रचारसभा झाली नाही.

महायुतीतील घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा परवाच एक मेळावा पार पडला. तसेच कच्छी गुजराथी समाजाने घेतलेल्या मेळाव्यात भाजपचे राज्यसभा सदस्य आले. याशिवाय, शिवसेनेचे स्टार प्रचारक आदेश बांदेकर यांनी प्रचार केला. प्रचाराची सगळी सूत्रे ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाहिली. म्हात्रे हे २५ वर्षे नगरसेवक आहेत. चार वेळा स्थायी समिती सभापती होते. त्यांचा २००९ च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून पराभव झाला होता. तेव्हाच्या चुका त्यांनी आता सुधारल्या आहेत.

दुसरीकडे मनसेचे उमेदवार पाटील यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला. प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर जास्त जोर दिला. पाटील हे २००९ मध्ये जि.प.वर बिनविरोध निवडून आले होते.
२०१४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजनही त्यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. त्यांच्या प्रचारार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डीएनसी ग्राउंडवर प्रचारसभा घेतली. त्यात रस्ते, वाहतूककोंडी या मुद्द्यांवर प्रहार केला.

तसेच रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या प्रमुख सोयीसुविधा देऊ शकत नाहीत. त्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार नाही, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे मतदारसंघातील समस्यांवर मनसे निवडणूक लढवत आहे. तर, म्हात्रे हे मतदारसंघात भोईर यांच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन देण्याच्या जोरावर निवडणूक रिंगणात आहे. त्यांच्या पाठीशी सत्तेतील शिवसेना-भाजप हे पक्ष आहेत. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर २००९ मध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघात प्रथम निवडणूक पार पडली. त्यावेळी पाटील यांचे बंधू रमेश पाटील हे मनसेतर्फे निवडून आले होते. पाच वर्षे हा मतदारसंघ मनसेच्या ताब्यात होता. त्यानंतर, २०१४ मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे सुभाष भोईर निवडून आले. या मतदारसंघात मतदारांनी बदल घडवला आहे. बदलाची पुनरावृत्ती होणार की, शिवसेना विजयाची परंपरा कायम राखणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

२७ गावांचा विकास, नगरपालिकेचे आश्वासन

म्हात्रे यांच्या जाहीरनाम्यात २७ गावे विकसित करण्याचा मुद्दा समाविष्ट आहे. तर, पाटील यांच्या जाहीरनाम्यात २७ गावांची वेगळी नगरपालिका हा मुद्दा आहे. तसेच दोघांनीही दिवा डम्पिंग ग्राउंड हटवण्याचे सामायिक आश्वासन दिले आहे. मतदार कोणाला झुकते माप देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Conditional Fighting in Kalyan Rural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.