आम्ही म्हणू ते धोरण अन् सांगू ते तोरण हे खपवून घेणार नाही; ठाण्यात शिंदेसेनेला भाजपाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:17 IST2026-01-17T16:16:42+5:302026-01-17T16:17:16+5:30
मागच्या वेळी आम्ही विरोधात होतो त्यामुळे जे काही निर्णय होईल आणि ठरेल त्यासाठी आम्ही तयार आहोत. आमची सत्ता किंवा विरोधी दोन्ही बाजूची तयारी आहे अशी भूमिका भाजपा आमदार केळकर यांनी मांडली आहे.

आम्ही म्हणू ते धोरण अन् सांगू ते तोरण हे खपवून घेणार नाही; ठाण्यात शिंदेसेनेला भाजपाचा इशारा
ठाणे - महापालिका निवडणुकीच्या निकालात ठाणे महापालिकेत भाजपा शिंदेसेना महायुतीला लोकांनी कौल दिला आहे. याठिकाणी भाजपाला २८ आणि शिंदेसेनेला ७५ जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी ठाण्यात भाजपा आणि शिंदेसेना यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. मात्र ऐन निवडणुकीपूर्वी या दोन्ही पक्षांनी युती करून निवडणूक लढवली. आता निकालानंतर पुन्हा एकदा भाजपा आणि शिंदेसेनेतील वाद समोर येत आहे. आम्ही म्हणू ते धोरण अन् सांगू ते तोरण हे खपवून घेणार नाही. वेळ पडल्यास विरोधी बाकांवरही बसण्याची तयारी आहे असा इशारा भाजपा आमदार संजय केळकर यांनी शिंदेसेनेला दिला आहे.
आमदार संजय केळकर म्हणाले की, आम्ही महायुती म्हणून १०० च्या वर जाऊ असं सांगितले होते तसं आम्ही १०० च्या वर गेलो. आम्ही सोबत किंवा विरोधी असलो तरीही पारदर्शक काम आणि विकास या दृष्टीने आम्ही अंकुश ठेवण्याचं काम करू. ठाणेकरांचा योग्य दिशेने विकास होतोय की नाही याबाबत आमचा कटाक्ष असेल. निश्चितपणे आम्ही तसं काम करू. आम्ही म्हणू ते धोरण आणि सांगू ते तोरण हे जसं प्रशासकीय राजवटीत व्हायचे ते आम्ही खपवून घेणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मागच्या वेळी आम्ही विरोधात होतो त्यामुळे जे काही निर्णय होईल आणि ठरेल त्यासाठी आम्ही तयार आहोत. आमची सत्ता किंवा विरोधी दोन्ही बाजूची तयारी आहे. पक्ष जे आम्हाला सांगेल ते स्वीकारायला तयार आहोत. सरकार असतानाही प्रशासकीय राजवटीत जे जे अयोग्य होते आणि गैर होते त्याविरोधात आम्ही चौकीदार म्हणून बोलत होतो. त्यामुळे सत्तेत असो वा विरोधात दोन्ही बाजूने आम्ही अंकुश ठेवण्याचं काम करू शकते. ठाण्याचे हित आणि ठाणेकरांचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यासाठी जे काही करायला लागेल ते करू असं आमदार संजय केळकर यांनी म्हटलं.
दरम्यान, शिवसेना-भाजपा युती म्हणून आम्ही निवडणूक लढली आहे आणि सत्तेत शिवसेना-भाजपा युती म्हणून राहावे अशी आमची इच्छा आहे. युतीबाबत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. योग्य सन्मान आम्ही नक्कीच देऊ. लोकांनी युती म्हणून मतदान केले आहे आणि युती म्हणून सत्तेत राहावे त्याचा सन्मान आम्ही राखू अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपाच्या भूमिकेवर दिली आहे.