Sangli Municipal Election 2026: दोन्ही राष्ट्रवादी-काँग्रेसचा छुपा समझोता, भाजप स्वबळावर; कोण किती जागा लढवणार..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:20 IST2025-12-31T13:18:53+5:302025-12-31T13:20:14+5:30
उद्धवसेना-मनसेची युती : भाजपच्या माजी नगरसेवकांकडून बंडाचे निशाण, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती

Sangli Municipal Election 2026: दोन्ही राष्ट्रवादी-काँग्रेसचा छुपा समझोता, भाजप स्वबळावर; कोण किती जागा लढवणार..वाचा
सांगली : महापालिका निवडणुकीत महायुती, महाआघाडीत फाटाफूट झाल्यानंतर भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. तिकीट नाकारलेल्या माजी नगरसेवकांनी इतर पक्षांकडून तर काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये आघाडीसाठी चर्चेच्या फेऱ्या झाल्या. अखेर तिन्ही पक्षात छुपा समझोता उघड झाला.
तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या हक्काच्या प्रभागात उमेदवार देण्याचे टाळले आहे. तरीही दोन ते तीन प्रभागांत मात्र आघाडीतच मैत्रीपूर्ण लढतही होणार आहे. उद्धवसेना व मनसेने युती करीत निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविले आहेत. महापालिकेची निवडणूक दुरंगी, तिरंगी होणार आहे. काही प्रभागात मात्र सर्वच पक्ष रिंगणात आहेत.
वाचा : कुपवाडला प्रभाग आठमध्ये एबी फॉर्मवरून गोंधळ, शिंदेसेनेत पडले दोन गट; तीन प्रभागात तिरंगी लढत
महापालिका निवडणुकीसाठी महायुती, महाआघाडीत सामना रंगणार असेच चित्र होते; पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र बहुरंगी लढतीचे संकेत मिळाले आहेत. भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यात माजी नगरसेवकांचा पत्ता कट झाल्याने काही जणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. त्यात विनायक सिंहासने, अप्सरा वायदंडे, कल्पना कोळेकर यांचा समावेश आहे. माजी उपमहापौर युवराज बावडेकर, माजी नगरसेविका सोनाली सागरे यांचे बंधू महेश सागरे यांनी शिंदेसेनेचा झेंडा हाती घेतला. माजी नगरसेविका अनारकली कुरणे, विजय घाडगे, गजानन मगदूम यांना महाआघाडीकडून उमेदवारी देण्यात आली.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची घोषणा झाली नसली तरी या तिन्ही पक्षांत छुपा समझोता झाला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) व काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने एकमेकांविरोधात उमेदवार देण्याचे टाळले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने मिरजेतील प्रभाग पाचमध्ये दोनच उमेदवार दिले. तर उर्वरित दोन उमेदवार काँग्रेसकडून रिंगणात आहेत. प्रभाग ३ व ४ हे अजित पवार पक्षाला सोडले आहेत. तिथे आघाडीने उमेदवार दिलेले नाहीत.
कुपवाडच्या प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादीला एक जागा दिली आहे. उर्वरित तीन जागांवर महाआघाडीचे उमेदवार आहेत. महाआघाडीशी चर्चा फिस्कटल्यानंतर उद्धवसेना व मनसेने युती केली. तर शिंदेसेनेने भाजपशी फारकत घेत स्वबळावर उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.
‘जनसुराज्य’साठी भाजपच्या चारजणांची माघार
भाजपसोबत जनसुराज्य पक्ष आणि आरपीआय आठवले गटाची युती झाली आहे. पण दोन्ही घटक पक्षाच्या उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार आहे. जनसुराज्य पक्षाकडून सहाजणांनी स्वतंत्रपणे अर्ज भरले आहेत. मात्र, त्यांना चार जागा देण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चार उमेदवारांना माघार घ्यावी लागणार आहे.
आघाडीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती
सांगलीवाडीच्या प्रभागात गत निवडणुकीप्रमाणे यंदाही काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात मैत्रीपूर्ण लढत होणार आहेत. दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल झाले आहेत. कुपवाडमधील प्रभाग एकमध्ये काँग्रेसने महिला गटातून अभियंता सूर्यवंशी यांना ‘एबी’ फाॅर्म दिला. तर याच गटातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने प्रियांका विचारे यांना उमेदवारी दिली आहे. मिरज येथील प्रभाग क्रमांक पाचमध्ये सर्वसाधारण गटात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने समीर कुपवाडे, तर काँग्रेसने संजय मेंढे यांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार) व काँग्रेस आमने-सामने
दोन्ही राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात उमेदवार दिले नसले तरी महाआघाडी व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात मात्र प्रभाग १५ मधील उमेदवारीवरून तिढा कायम राहिला. या प्रभागातून काँग्रेसने चारही उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने चौघांना उमेदवारी देत काँग्रेससमोर आव्हान उभे केले.
महापालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर लढत आहेत. जनसुराज्य शक्ती पक्ष आणि आरपीआय या दोघांच्या सोबत घेतले आहे. पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या असल्याने नाराजी असली तरी येत्या दोन दिवसांत नाराजांची समजूत काढून अपक्ष अर्ज माघारी घेतले जातील. - शेखर इनामदार, निवडणूक प्रमुख, भाजप
कोणता पक्ष किती जागा?
भाजप : ७३
जनसुराज्य : ४
रिपाइं : १
काँग्रेस : ३४
राष्ट्रवादी (अजित पवार) : ३३
राष्ट्रवादी (शरद पवार) : २२
शिंदेसेना : ५०
उद्धवसेना : २८
मनसे : ५