Let Go Tips : अनेकदा आपल्या बिझी शेड्युलमधून जरा रिकामा वेळ काढून आपण कुठेतरी निवांत शांत ठिकाणी बसलेलो असतो आणि इकड-तिकडच्या गोष्टींचा विचार करत असताना अचानक भूतकाळातील एखादी दुखरी आठवण मनात येते. जखम जुनी असली तरी ती आजही ओलीच असते. अशा आठवणी आणि भावना आपण मनाच्या एका कोपऱ्यात सतत साठवून ठेवतो, तेव्हा त्याचा परिणाम हळूहळू आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही होऊ लागतो. म्हणूनच काही गोष्टींना “लेट गो” करणं म्हणजेच सोडून देणं खूप गरजेचं असतं. यामुळे मन हलकं होतं आणि आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहता येतं.
जुन्या गोष्टी सोडून दिल्याने काय फायदे होतात?
तणाव कमी होतो
भावनांवर नियंत्रण ठेवणं सोपं होतं
चिंता आणि ओव्हरथिंकिंग कमी होतं
मन अधिक शांत आणि आनंदी राहतं
झोपेची गुणवत्ता सुधारते
नात्यांमध्ये समतोल राखता येतो
आयुष्यातील आनंद मनमोकळेपणाने अनुभवता येतो
‘लेट गो’ करण्यासाठी हे उपाय उपयोगी ठरू शकतात
वर्तमानात रहा
अचानक जुन्या आठवणी डोक्यात आल्या तर स्वतःचं लक्ष आजूबाजूच्या गोष्टींकडे वळवा. एखादा आवाज ऐका, थंड किंवा गरम वस्तूला स्पर्श करा किंवा कपड्यांचा स्पर्श जाणून घ्या. स्वतःला सतत सांगा “ही फक्त एक आठवण आहे.”
माफ करणं मनासाठी हेल्दी
काही नाती खूप वेदना देतात. पण त्या भावनांचं ओझं कायम मनात ठेवणं अधिक त्रासदायक ठरू शकतं. त्या व्यक्तीसाठी एक पत्र लिहा, जरी ते पाठवायचं नसलं तरी. यामुळे मन हलकं होण्यास मदत मिळते.
भूतकाळ मागेच सोडा
आपला मेंदू वाईट अनुभव लक्षात ठेवतो, कारण तो आपल्याला भविष्यात सावध राहण्यास मदत करतो. पण सतत जुन्या दुखऱ्या आठवणींमध्ये अडकून राहणं मानसिक आरोग्यासाठी चांगलं नसतं.
अपयशाने स्वतःला मर्यादित करू नका
एखाद्या गोष्टीत अपयश आलं म्हणून कायम त्याच विचारात राहू नका. त्यातून काय शिकता येईल हे समजून पुन्हा नव्याने प्रयत्न करा.
छोट्या गोष्टींनीही फरक पडतो
लेट गो करण्यासाठी नेहमी मोठं पाऊल उचलावं लागतं असं नाही. कधी कधी एक खोल श्वास घेणंसुद्धा पुरेसं असतं. यामुळे मनातील ताण आणि छातीत जाणवणारा भार कमी होण्यास मदत होते.
