मोड आलेली कडधान्य खाणं आरोग्यासाठी चांगलेच आहे. कडधान्यांमधून चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स, फायबर तसेच इतर काही महत्त्वाचे घटक मिळतात. त्यामुळे आठवड्यातून २ ते ३ वेळा कडधान्ये खायलाच हवे असं आहारतज्ज्ञ नेहमीच सांगतात. पण त्या कडधान्यांचा शरीराला पुरेसा फायदा होण्यासाठी ती योग्य पद्धतीने खाल्ली जाणं गरजेचं आहे. अन्यथा त्यातून शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होण्याची शक्यता असते. म्हणूनच कडधान्य कशा पद्धतीने खायला हवीत याविषयी आहारतज्ज्ञांनी शेअर केलेली ही माहिती वाचायलाच हवी..(Avoid 3 Mistakes While Eating Sprouts)
कडधान्य खाताना कोणत्या चुका टाळायला हव्या?
याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी leemamahajan या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले काही महत्त्वाचे मुद्दे...
१. कडधान्य आपण काही तास पाण्यात भिजत ठेवतो आणि नंतर त्यांना चांगले मोड यावेत म्हणून ते बांधून ठेवतो. मोड येण्यासाठी कडधान्यांना दमट आणि ओलसर वातावरण हवं असतं. या वातावरणातच काही बॅक्टेरियांचीही चांगली वाढ होते. त्यामुळे कडधान्यांवरही बॅक्टेरिया असतात आणि ते नुसती कडधान्ये धुवून निघत नाहीत.
२. कडधान्यांवर जमा झालेले बॅक्टेरिया काढायचे असतील तर ते शिजवूनच घ्यावे लागतात. जेव्हा तुम्ही ते शिजवता किंवा थोडे वाफवून घेता तेव्हा बॅक्टेरिया मरतात आणि उसळी खाण्यायोग्य होतात. अन्यथा त्यातून पोटदुखी, डायरिया, अपचन, मळमळ, उलट्या असा त्रास होऊ शकतो. याच कारणासाठी कडधान्य कच्ची खाणंही टाळायला हवं.
३. फक्त प्रोटीन्स मिळविण्यासाठी कडधान्यं खात असाल तर १ वाटी कच्च्या कडधान्यांमधून जेवढे प्रोटीन्स मिळतात, त्यापेक्षाही जास्त प्रोटीन १ वाटी शिजवलेल्या डाळीतून मिळतात. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची खाण्यापेक्षा ती शिजवून खाणं जास्त चांगलं.
