रायगड जिल्ह्यात सातपैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीची बाजी; श्रीवर्धन महाआघाडीच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 12:20 AM2019-10-25T00:20:58+5:302019-10-25T00:21:29+5:30

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघांचे निकाल हे अनपेक्षित लागले आहेत.

Maharashtra Election 2019: NCP win shrivardhan Constituency | रायगड जिल्ह्यात सातपैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीची बाजी; श्रीवर्धन महाआघाडीच्या ताब्यात

रायगड जिल्ह्यात सातपैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीची बाजी; श्रीवर्धन महाआघाडीच्या ताब्यात

googlenewsNext

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघांचे निकाल हे अनपेक्षित लागले आहेत. शिवसेनेने तीन जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर भाजपने दोन जागा सहजपणे खिशात घातल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आपली जागा कायम ठेवण्यात यश संपादन केले आहे. उरणमध्ये बंडखोरी झाल्याने ही जागा मात्र अपक्षाच्या पदरात पडली आहे. लागलेल्या निकालावरून मतदारांनी शेकापला दूर करतानाच काँग्रेसला सपशेल नाकारल्याचे दिसून येते. या ठिकाणी निकाल घोषित होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भगवे झेंडे फडकवत त्यांनी आनंद साजरा केला.

गुरुवारी मतमोजणी केंद्रांवर २४ ते २७ फेऱ्यांच्या माध्यमातून निकाल पुढे येत होता. तसा उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांच्या काळजात धाकधूक वाढत होती. सुरुवातीपासूनच महायुतीच्या उमेदवारांनी मतांमध्ये आघाडी घेण्याला सुरुवात केली होती. पुढच्या फेरीत तरी निदान आपल्या उमेदवाराला मताधिक्य मिळेल, असे शेकाप, काँग्रेसच्या उमेदवारांना वाटत होते. मात्र, अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी, पेणमध्ये भाजपचे रवींद्र पाटील, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले, पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर आणि श्रीवर्धनमधीलराष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अदिती तटकरे या उमेदवारांनी सुरुवातीपासूच मतांचा मोठा आकडा गाठला.

त्यानंतर पुढील प्रत्येक फेरीमध्ये त्यांचे मताधिक्य हे वाढतच गेले. त्यामुळे विरोधी गोटामध्ये शांतता पसरली होती. आपला उमेदवार पडणार हे साधारणपणे १५ व्या फेरीनंतर दिसून येत होते. त्यानंतर हळूहळू उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. मतदान केंद्रातून निकाल बाहेर पडण्याआधी बाहेरूनच फेरीनिहाय मतांची आकडेवारी सोशल मीडियावर फिरत होती. त्यामुळे केंद्राबाहेरील समर्थकांमध्ये कमालीचा उत्साह संचारल्याचे चित्र होते.

शेकापला पूर्णपणे अपयश

जिल्ह्यातील सात मतदारसंघ आहेत. यात महायुती विरुद्ध महाआघाडी यांच्यात सरळ लढत होती. त्यात महायुतीने पाच जागा जिंकल्या. आघाडीने एका जागेवर यश मिळविले तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला. शिवसेनेने तीन, भाजपने दोन, राष्ट्रवादी काँग्रेसने एक मतदारसंघात विजय मिळवला आहे. उरणमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, पनवेल, उरण, कर्जत, महाड, पेण, श्रीवर्धन असे सात मतदारसंघ आहेत. पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी, कर्जतमध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे, पेणमध्ये भाजपचे रवींद्र पाटील, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले, श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे तर उरणमध्ये अपक्ष महेश बालदी विजयी झाले आहेत. शेकापला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. रायगडमध्ये एकही जागेवर विजय न मिळविण्याची शेकापची ही पहिलीच वेळ आहे.

प्रशांत ठाकूर यांची हॅट्ट्रिक
पनवेलमध्ये भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांनी, तर महाडमध्ये शिवसेनेचे आ. भारत गोगावले यांनी सलग तीन वेळा निवडून येऊन हॅट्ट्रिक केली. काँग्रेसलाही भोपळा फोडता आला नाही.
अलिबाग आणि पेण मतदारसंघामध्ये काँग्रेस आघाडीत नव्हती. त्यामुळे येथे स्वतंत्र उमेदवार उभे केले. मात्र, शेकापला मदत करण्यासाठीच काँग्रेसने उमेदवार दिले आहेत. हे मतदारांना पटवण्यात शिवसेना-भाजप यशस्वी ठरल्यानेच काँग्रेसची मते ही अन्यत्र वळली.
शेकापने अलिबाग मतदारसंघात नऊ वेळा तर एकदा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंड्याखाली निवडणूक जिंकली होती. काँग्रेसने चार वेळा आमदारकीवर शिक्कामोर्तब केले होते. शिवसेनेने या मतदारसंघात आमदार होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले नव्हते. महेंद्र दळवी यांनी २०१४ च्या निवडणुकीत शेकापक्षासमोर आव्हान उभे केले होते; परंतु या वेळी शेकापचा विजय झाला होता. आता मात्र त्यांनी शेकापला धूळ चारत प्रथमच अलिबागवर भगवा फडकवला.

निवडणूक ठरली ऐतिहासिक

यंदाची विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात शेकापला व्हाइट वॉश मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात शेकापचा एकही उमेदवार निवडून न येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. पनवेलमध्ये भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तर महाडमध्ये शिवसेनेचे आमदार भारत गोगावले यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी तर पेणमध्ये भाजपचे रवींद्र पाटील यांच्या रूपाने बºयाच वर्षांनी विजय संपादित करता आला आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनीही उरणमध्ये विजय मिळविला आहे.

पनवेल मतदारसंघात भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी शेकापचे हरेश केणी यांचा तब्बल ९२ हजार ३७० मतांनी पराभव करत ते जायंट किलर ठरले आहेत. प्रशांत ठाकूर यांना १ लाख ७८ हजार ५८१ मते मिळाली, तर शेकापचे हरेश केणी यांना ८६ हजार २११ मते मिळाली आहेत.
या निकालांची काही ठळक वैशिष्ट्ये

पेण मतदारसंघामध्ये काँग्रेसचे रवींद्र पाटील यांचा भाजपप्रवेश करून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चांगलीच खेळी केली. भाजपने रवींद्र पाटील त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. त्यामुळे चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णय योग्य ठरला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या विरोधात शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते. त्यांनी उमेदवारही उभे केले. मात्र, युतीच्या विरोधात शेकाप आणि काँग्रेसचे उमेदवार तग धरू शकले नाहीत.

उरण मतदारसंघामध्ये भाजपचे महेश बालदी यांनी केलेली बंडखोरी भाजपला रोखता आली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात बालदी यांनी निवडणूक लढली आणि ते जिंकलेही, त्यामुळे शिवसेना बंडखोरीची किंमत चुकवावी लागली, शिवाय उरणची हातची जागाही गेली.

Web Title: Maharashtra Election 2019: NCP win shrivardhan Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.