धंगेकर पॅटर्नला 'ब्रेक'! कसब्यात भाजपचे गणेश बिडकर विजयी; धंगेकरांच्या पत्नी आणि पुत्राचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 20:09 IST2026-01-16T20:08:02+5:302026-01-16T20:09:43+5:30
PMC Result 2026 Dhangekar Result: पुणे मनपा निकाल २०२६: प्रभाग २४ मधून भाजपचे गणेश बिडकर विजयी. रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव आणि पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव. पाहा सविस्तर निकाल.

धंगेकर पॅटर्नला 'ब्रेक'! कसब्यात भाजपचे गणेश बिडकर विजयी; धंगेकरांच्या पत्नी आणि पुत्राचा पराभव
Pune Municipal Election Results 2026: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक २४ आणि प्रभाग २३ मध्ये रवींद्र धंगेकर यांच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. प्रभाग २४ मधून भाजपचे दिग्गज नेते गणेश बिडकर यांनी रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.
धंगेकर कुटुंबाला दुहेरी फटका:
१. प्रणव धंगेकर (पुत्र): प्रभाग २४ मधून शिवसेना (शिंदे गट) कडून लढणाऱ्या प्रणव धंगेकर यांचा भाजपच्या गणेश बिडकर यांनी पराभव केला. बिडकर यांनी पहिल्या फेरीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली.
२. प्रतिभा धंगेकर (पत्नी): प्रभाग २३ मधून निवडणूक लढवणाऱ्या प्रतिभा धंगेकर यांचाही पराभव झाला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सोनाली आंदेकर यांनी धूळ चारली.
निकालाचे महत्त्वाचे पैलू:
बिडकरांचे पुनरागमन
गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या गणेश बिडकर यांनी या विजयाद्वारे जोरदार पुनरागमन केले आहे. त्यांच्या समर्थकांनी निकालापूर्वीच त्यांना 'पुण्याचे भावी महापौर' म्हणून संबोधणारे फलक लावले होते, ज्यावर आता विजयाची मोहोर उमटली आहे.
आंदेकर फॅक्टर
प्रभाग २३ मध्ये तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर यांनी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केल्याने कसब्यातील अंतर्गत राजकीय समीकरणे बदलल्याचे स्पष्ट होत आहे. पोटनिवडणुकीत भाजपचा २८ वर्षांचा गड फोडणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना महापालिका निवडणुकीत मात्र आपल्या कुटुंबातील जागा वाचवता आलेल्या नाहीत.