Bigg Boss Marathi 3: 'हे' आहेत 'बिग बॉस'च्या घरातील १५ स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 08:03 PM2021-09-19T20:03:16+5:302021-09-19T22:20:01+5:30

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात सहभागी झालेले सेलिब्रिटी कोण माहितीये का?

सध्या सर्वत्र चर्चा रंगतीये ती 'बिग बॉस मराठी ३'च्या स्पर्धकांची. नुकतीच 'बिग बॉस'च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली असून अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी यंदाच्या पर्वात सहभाग घेतला आहे. त्यामुळेच 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी झालेले सेलिब्रिटी नेमके कोण ते पाहुयात.

सोनाली पाटील - 'बिग बॉस मराठी ३'च्या घरात प्रवेश करणारी पहिली स्पर्धक सोनाली पाटील ठरली आहे. सोनालीने 'देवमाणूस', 'वैजू नं १' या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.

विशाल निकम - 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी होणारा दुसरा स्पर्धक विशाल निकम आहे. विशालने 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेच ज्योतिबाची भूमिका साकारली आहे.

स्नेहा वाघ - मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा वाघ हिनेदेखील 'बिग बॉस मराठी ३'च्या घरात प्रवेश केला आहे. स्नेहा तिच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात आता स्नेहाचं वागणं कसं असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. स्नेहाने अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.

उत्कर्ष शिंदे - मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक उत्कर्ष शिंदे यानेदेखील 'बिग बॉस मराठी ३' मध्ये सहभाग घेतला आहे. उत्कर्ष उत्तम गायक असण्यासोबतच तो डॉक्टरदेखील आहे.

मीरा जगन्नाथ - 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मीरा जगन्नाथ. 'येऊ कशी तशी..'मध्ये मीराने मोमो ही भूमिका साकारली असून सध्याच्या घडीला ती लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

तृप्ती देसाई - महिलांच्या विषयांवर आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई यांनी आता बिग बॉस मराठी ३ च्या पर्वात सहभाग घेतला आहे.

आविष्कार दारव्हेकर- मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आविष्कार दारव्हेकरदेखील बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी झाला आहे. आविष्कारने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच तो 'तू माझा सांगाती' या मालिकेत झळकला होता.

सुरेखा कुडची - प्रसिद्ध मराठी लावणी नृत्यांगना आणि अभिनेत्री सुरेखा कुडची बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी झाली आहे. १९९७ मध्ये सुरेखाने कलाविश्वात पदार्पण केलं.'अशी असावी सासू', 'भरत आला परत', 'तुच माझी राणी', 'सासुची माया', 'खुर्ची सम्राट', 'तीन बायका फजिती ऐका', 'फॉरेनची पाटलीन' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.

गायत्री दातार - तुला पाहते रे या मालिकेत इशा निमकर ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. अभिनेता सुबोध भावेसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या गायत्रीने आता बिग बॉस मराठी ३ च्या घरात प्रवेश केला आहे.

विकास पाटील - 'बायको अशी हव्वी'फेम विकास पाटीलने बिग बॉसमध्ये सहभाग घेतला आहे. विकास लोकप्रिय अभिनेता असून त्याने 'चार दिवस सासूचे', 'कुलवधू' ,'लेक माझी लाडकी', 'असंभव', 'अंतरपाट', 'माझीया माहेरा', 'सुवासिनी', 'मिसेस तेंडुलकर' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

शिवलीला पाटील - कीर्तन म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर फेटेवाले कीर्तनकार उभे राहतात. मात्र, आता या क्षेत्रातही महिला कीर्तनकार दिसू लागल्या आहेत. यातलीच एक युवा कीर्तनकार शिवलीला पाटील असून त्यांनी बिग बॉसमध्ये सहभाग घेतला आहे.

मीनल शाह - MTV ROADIES मध्ये झळकलेली मीनल शाह डिजिटल क्रिएटर आहे. हिंदी कलाविश्वात झळकलेली मीनल आता बिग बॉस मराठीमध्ये झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.

जय दुधाणे - MTV SPLITSVILLA 13मध्ये झळकलेल्या जय दुधाणे 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी झाला आहे.

अक्षय वाघमारे - अरुण गवळींचा जावई आणि अभिनेता अक्षय वाघमारे यंदा बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी झाला आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय एका गोड मुलीचा बाबा झाला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या लेकीपासून दूर राहून अक्षय या स्पर्धेत कसा टिकणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

संतोष (दादुस) चौधरी- आगरी कोळी गाण्यांचा बादशाह संतोष ऊर्फ दादूस चौधरीदेखील यंदाच्या बिग बॉसमध्ये सहभागी झाला आहे.