भाजपाचं 'अबकी बार ४०० पार' टार्गेट संकटात; ४ नव्या आव्हानांमुळे डोकेदुखी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 06:37 PM2024-04-10T18:37:37+5:302024-04-10T18:42:57+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा भारतीय जनता पार्टी किमान ३७० जागा जिंकेल आणि एनडीए ४०० पार जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. अबकी बार ४०० पारसाठी भाजपा कार्यकर्तेही मेहनत घेत आहेत. पंतप्रधान मोदीही सातत्याने रॅली, सभा घेत आहेत. पक्षाचे इतर नेतेही प्रचारात उतरलेत.

४०० पार टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. मात्र भाजपाला रोखण्यासाठी इंडिया आघाडीही पाऊले उचलत आहेत. त्यात आता भाजपासमोर ४ नव्या अडचणी आल्या आहेत. या समस्या सोडवण्यात भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे ४०० पारचं टार्गेट पूर्ण होईल का अशी शंका निर्माण झाली आहे.

पहिली अडचण - कर्नाटकात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास १७ टक्के लोकसंख्या असलेला हा समाज नाराज झाला तर भाजपासाठी अडचणीचं होईल. लिंगायत समुदायाचे मोठे संत जगद्गुरु फकीरा दिंग्लेश्वर महास्वामी यांनी केंद्रीय मंत्र्यांविरोधात लढण्याची घोषणा केली आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यामुळे अनेक महत्त्वाच्या लिंगायत नेत्यांचे तिकिट कापले गेले अशी नाराजी दिंग्लेश्वर यांची आहे. लिंगायत समाज गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी आरक्षणाची मागणी करतोय. त्यात लिंगायत नेत्यांना डावलल्यामुळे दिंग्लेश्वर सातत्याने भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेत आहेत.

दुसरी अडचण - मागील आठवड्यात गुजरात आणि उत्तर प्रदेशातील राजपूत समाजाने भाजपाविरोधात मोर्चा उघडला आहे. राजपूत समाजाबाबत केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केलेल्या विधानानंतर भाजपाविरोधात नाराजी आहे. तर पश्चिम उत्तर प्रदेशात वीके सिंह यांचं तिकिट कापल्यानंतर राजपूत महासभा भाजपाविरोधात आली आहे. राजपूत बहुसंख्य असतानाही गाझियाबाद, नोएडा येथे कुठल्याही राजपूत उमेदवाराला तिकिट मिळालं नाही अशी नाराजी त्यांची आहे.

गुजरातमध्ये राजपूत यांची लोकसंख्या १७ टक्के आहे, सौराष्ट, कच्छ भागात त्यांचा प्रभाव आहे. तर पश्चिम उत्तर प्रदेशातही राजपूत यांची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरते. भाजपाचे बडे नेते राजपूत समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतायेत. परंतु मोठ्या प्रमाणात राजपूत संघटनांच्या बैठका सुरू आहेत.

तिसरी अडचण - उत्तर प्रदेशात मागील काही महिन्यांपासून बसपाला भाजपाची बी टीम म्हणून टार्गेट केले जात आहे. मात्र यंदा बसपानं भाजपाविरोधात असे उमेदवार उभे केलेत त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. भाजपातील अनेक बंडखोरांना बसपानं तिकिट दिले आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपाला मतविभाजनाचा फटका बसू शकतो

चौथी अडचण - याआधी भाजपात कुणाचे तिकिट कापले तरीही कुणी बोलत नव्हते. परंतु आता मोदी-शाह यांनी तिकीट कापल्यानंतर अनेकजण उघडपणे बोलतायेत. हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, बिहार, महाराष्ट्रातही असंतोष पाहायला मिळतोय.

हरियाणात तिकिट न मिळाल्याने बिजेंद्र सिंह आणि त्यांचे वडील विरेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. कर्नाटकात भाजपाचे ज्येष्ठ नेते एस ईश्वरप्पा यांनी माजी मुख्यमंत्री बी.एस येदियुरप्पा यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.

बिहारमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी तिकीट कापल्यामुळे नाराजी व्यक्त केली. आतापर्यंतच्या प्रचारात ते सक्रीय सहभागी झाले नाहीत. राजस्थानात २ वेळा खासदार राहिलेले राहुल कस्वा यांनी काँग्रेसचा हात पकडला असून त्यांना काँग्रेसने तिकिट दिले आहे.