भाजप सरकार आलं तर 'या' गोष्टी मोफत मिळणार, PM मोदींनी सांगितला पुढील 5 वर्षांचा प्लॅन! केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 03:49 PM2024-04-14T15:49:50+5:302024-04-14T15:57:15+5:30

भाजप सरकार आल्यास, पुढील 5 वर्षांत काय काम करणार आणि 5 वर्षे देशातील नागरिकांना काय काय मोफत मिळणार...?

लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने आपले संकल्प पत्र (जाहीरनामा) जारी केले आहे. भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले. यावेळी, भाजप सरकार आल्यास, पुढील 5 वर्षांत काय काम करणार आणि 5 वर्षे देशातील नागरिकांना काय काय मोफत मिळणार? हेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब या चार जातींना केंद्र स्थानी ठेवून हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी मोफत वीज योजना आणि मोफत धान्य योजना, पीएम स्वानिधी योजना, उज्ज्वला योजना, तसेच आयुष्मान योजना आदी योजनांसंदर्भात अनेक मोठ्या घोषणा केल्या.

5 वर्षांसाठी राशन मोफत - पंतप्रधान मोदी म्हणाले, पुढील पाच वर्षांसाठी गरीब कुटुंबांना मोफत रेशन दिले जाईल. मोफत रेशन योजना 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 80 कोटींहून अधिक कुटुंबांना मोफत रेशन दिले जाते. आम्ही गरिबांचे ताट सुरक्षित ठेवू.

पंतप्रधान म्हणाले, सरकार आल्यास, पुढील पाच वर्षांत पीएम आवास योजनेची व्याप्ती वाढविण्यात येईल. 4 कोटींहून अधिक कुटुंबांना कायमस्वरूपी घरे देण्यात आली आहेत.

आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवणार - पंतप्रधान म्हणाले, आयुष्मान भारत योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. आगामी काळात याची व्याप्ती वाढवण्यात येईल. याअंतर्गत इतर आरोग्य सेवांचाही समावेश केला जाईल.

70 वर्षांवरील सर्व वृद्धांना मोफत उपचार - तसेच जनऔषधी केंद्रांवर 80 टक्के सवलतीच्या दराने औषधी उपलब्ध करून दिली जाईल. याशिवाय, 70 वर्षांवरील सर्व वृद्धांना आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल.

पाइपलाइनच्या माध्यमाने मिळणार LPG - पंतप्रधान म्हणाले, उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन दिले जात असून प्रत्येक घरात गॅसची सुविधा पोहोचली आहे. आता घरा-घरात स्वस्त स्वयंपाकाचा गॅस पाईपद्वारे पोहोचवला जाईल. तसेच, 3 कोटी कुटुंबांना कायमस्वरूपी घरे दिली जाणार आहेत.

मोफत वीज - पंतप्रधान मोदी म्हणाले, पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत सौरऊर्जेद्वारे 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. एवढेच नाही तर सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करून लोक वर्षाला हजारो रुपये कमवू शकतील.

मुद्रा योजना - मोदी म्हणाले, मुद्रा योजनेची सीमा 10 लाखवरून वाढवून 20 लाख करण्यात आली आहे. याशिवाय, पीएम स्‍वनिधी योजनेची सीमा वाढवून ती गांवांपर्यंतही पोहोचली जाईल.