Amit Shah: "रामोजीरावांचा प्रवास प्रेरणादायी, तर ज्युनियर NTR तेलुगू सिनेमाचं रत्न"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 11:14 AM2022-08-22T11:14:56+5:302022-08-22T12:38:49+5:30

Amit Shah: आरआरआर सिनेमातील दमदार भूमिकेमुळे पुन्हा एकदा देशभरात अभिनयाची छाप सोडणाऱ्या ज्युनियर एनटीआरने भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली.

आरआरआर सिनेमातील दमदार भूमिकेमुळे पुन्हा एकदा देशभरात अभिनयाची छाप सोडणाऱ्या ज्युनियर एनटीआरने भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. तसेच, रामोजी फिल्म सिटीचे सर्वेसर्वा रामोजी राव यांच्या हैदराबाद येथील निवास्थानालाही भेट दिली.

विशेष म्हणजे या भेटीनंतर अमित शहा यांनी अभिनेता एनटीआरवर स्तुतीसुमने उधळली आहेत. तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे ही भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आता ज्युनियर एनटीआर भाजप जॉईन करणार का, याची चर्चाही सोशल मीडियात होत आहे.

अमित शहांनी स्वत: अभिनेत्यासोबतचे फोटो शेअर केले असून दोघेही एकमेकांच्या हातात हात देत असल्याचं या फोटोत दिसून येत आहे. तेलुगू सिनेमाचा रत्न आणि प्रतिभाशाली अभिनेता ज्युनियर एनटीआरची हैदराबादेत भेट झाली, असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.

सध्या या नेता आणि अभिनेत्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोवर नेटीझन्सकडून मजेशीर कमेंट केल्या जात आहेत. तर, अनेकांनी या भेटीवर आनंद व्यक्त केला आहे.

काहींनी हे फोटो पाहून आता ज्युनियर भाजपात प्रवेश करतील, असेही भाकीत केलं आहे. मात्र, ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं समजते.

दरम्यान, अमित शहा यांनी हैदराबाद दौऱ्यावर रामोजी फिल्म सिटीचे सर्वेसर्वा रामोजीराव यांचीही भेट घेतली. रामोजी रावांचं आयुष्य हे प्रेरणादायी आणि उत्कंठावर्धक आहे.

सिनेसृष्टीतील त्यांचं योगदान हे बॉलिवूडसह सिनेसृष्टीतील कोट्यवधी लोकांना प्रेरणा देणारं आहे. आज, त्यांच्या हैदराबाद येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली, असे अमित शहा यांनी ट्विटद्वारे सांगितले. सध्या, या भेटीची देशभरात चर्चा रंगली आहे.

हैदराबाद येथे अमित शहांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तेथील जनतेलाही संबोधित केले. या दौऱ्यात आगामी काळात दक्षिण भारतात भाजपचा विस्तार वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं.